वीजमिटरचा तुटवडा संपला; महावितरणकडे ४ लाख मिटर उपलब्ध
By Atul.jaiswal | Updated: September 1, 2018 18:40 IST2018-09-01T18:38:10+5:302018-09-01T18:40:14+5:30
अकोला : महावितरणचा वीज मिटरचा तुटवडा संपुष्टात आला आहे. आजमितीस महावितरणच्या राज्यभरातील विविध कार्यालयांत सिंगल फेजचे सध्या सुमारे २ लाख ३१ हजार तर थ्रीफेजचे सुमारे १ लाख ६३ हजार असे एकून ३ लाख ९४ हजार नवीन मीटर उपलब्ध असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

वीजमिटरचा तुटवडा संपला; महावितरणकडे ४ लाख मिटर उपलब्ध
अकोला : महावितरणचा वीज मिटरचा तुटवडा संपुष्टात आला आहे. आजमितीस महावितरणच्या राज्यभरातील विविध कार्यालयांत सिंगल फेजचे सध्या सुमारे २ लाख ३१ हजार तर थ्रीफेजचे सुमारे १ लाख ६३ हजार असे एकून ३ लाख ९४ हजार नवीन मीटर उपलब्ध असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मागील काही महिन्यांत केंद्र शासन पुरस्कृत सौभाग्य योजना तसेच दिनदयाळ उपाध्याय योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या. तसेच संपूर्ण राज्यात जुनी इलेक्ट्रो-मेकॅनीकल मीटर व नादुरुस्त मीटर बदलविण्याची मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात मीटरचा तुटवडा जाणवला होता. परंतु आता राज्यात कुठेही मीटरचा तुटवडा नाही. वीज मीटरचा तुटवडा जाणवू नये म्हणून महावितरणने आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. सद्याच्या घडीला महावितरणच्या विविध कार्यालयांत सिंगल फेजचे सुमारे २ लाख ३१ हजार तर थ्रीफेजचे सुमारे १ लाख ६३ हजार नवीन मीटर उपलब्ध आहेत,असे महावितरणने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
मे पर्यंत मिळणार ३० लाख नवीन मिटर
महावितरणने ३० लाख नवीन सिंगलफेज वीजमीटरची खरेदी केली असून, पहिल्या टप्प्यात त्यातील ८९ हजार नवीन मीटर आॅगस्ट महिन्यात विविध कार्यालयांत उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सप्टेंबर महिन्यात सुमारे २ लाख ६० हजार मीटर्स उपलब्ध होणार आहेत. त्यानंतर पुढील प्रत्येक महिन्यात सुमारे ३ लाख ८० हजार नवीन वीजमीटर ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत. २०१९ च्या मे महिन्यापर्यन्त हे ३० लाख मीटर महावितरणला मिळणार आहेत.
आणखी २० लाख मीटरसाठी निविदा प्रक्रिया सुरू
भविष्यात महावितरणच्या वीजग्राहकांना नवीन मीटरची टंचाई जाणवू नये म्हणून आणखी २० लाख मीटर नव्याने घेण्याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांना महावितरणकडे असलेली मीटर्सची उपलब्धता महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे.