आचारसंहितेतही दुष्काळी मदत वाटप करता येणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 14:44 IST2019-02-22T14:44:19+5:302019-02-22T14:44:26+5:30
अकोला: आचारसंहिता लागू असलेल्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात दुष्काळी मदतीचे वाटप शासकीय नियमानुसार करण्यास हरकत नसल्याचे पत्र राज्य निवडणूक आयोगामार्फत १४ फेबु्रवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकाºयांना निर्गमित करण्यात आले आहे.

आचारसंहितेतही दुष्काळी मदत वाटप करता येणार!
- संतोष येलकर
अकोला: आचारसंहिता लागू असलेल्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात दुष्काळी मदतीचे वाटप शासकीय नियमानुसार करण्यास हरकत नसल्याचे पत्र राज्य निवडणूक आयोगामार्फत १४ फेबु्रवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकाºयांना निर्गमित करण्यात आले आहे. त्यामुळे आचारसंहितेतही दुष्काळी मदतीचे वाटप करता येणार आहे.
राज्यातील २६४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम घोषित करण्यात आला असून, निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या गत १४ आॅक्टोबर २०१६ रोजीच्या आचारसंहिता संदर्भात एकत्रित आदेशातील भाग क्र . ४ अनुक्रमांक -४ मध्ये ‘दुष्काळ, पाणीटंचाई, इतर नैसर्गिक आपत्ती व गंभीररीत्या आजारी असलेल्यांना मदत करणे व सुरू असलेल्या योजना पुढे सुरू ठेवता येतील. आचारसंहिता असल्याने दुष्काळ अथवा पाणीटंचाई दूर करण्याबाबत कार्यवाही करू नये, असा आचारसंहितेचा अर्थ होत नाही. त्यामुळे दुष्काळ, पाणीटंचाई व नैसर्गिक आपत्ती निवारण करण्यासाठी बंदी असणार नाही, असे नमूद करण्यात आले आहे. त्यानुषंगाने आचारसंहिता असलेल्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात दुष्काळी मदतीचे वाटप शासकीय नियमानुसार करण्यास हरकत नाही. असे पत्र राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी १४ फेबु्रवारी रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकाºयांना निर्गमित केले. त्यामुळे आचारसंहितेतही दुष्काळी मदतीचे वाटप करता येणार आहे.
मदतीचे वाटप करताना मंत्री-लोकप्रतिनिधी नको!
आचारसंहिता असलेल्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात दुष्काळी मदत वाटप करण्यास हरकत नाही. तथापि, मदतीचे वाटप करताना मंत्री, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, सदस्य उपस्थित नसावे तसेच आचारसंहितेचा भंग होईल, अशा कोणत्याही प्रकारचे कृत्य करण्यात येऊ नये, अशा सूचनाही राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रात देण्यात आल्या आहेत.