सूडबुद्धीने कारवाई नको, ‘वंचित’कडून शरद पवारांची पाठराखण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 21:57 IST2019-09-25T21:57:34+5:302019-09-25T21:57:52+5:30
'राजकीय विरोधकांना संपवण्याचा हा कुटील प्रयत्न भाजप-शिवसेना सरकार करत आहे'

सूडबुद्धीने कारवाई नको, ‘वंचित’कडून शरद पवारांची पाठराखण!
अकोला : वंचित बहूजन आघाडीने जाहिरपणे शरद पवार यांना टिकेचे लक्ष्य केले आहे. काँग्रेस सोबत आघाडी करू मात्र राष्ट्रवादी नको अशी जाहीर भूमिका प्रकाश आंबेडकरांनी मांडली होती. मात्र आता शरद पवारांवर राज्य मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)ने केलेल्या कारवाईचा निषेध करून एकप्रकारे शरद पवारांची पाठराखण केली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या सूचनेनुसार पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यात नमूद केले आहे की, शिखर बँकेच्या घोटाळ्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. ईडीने चौकशी सुरू केली आहे. सदर चौकशी ही राजकीय आकसा पोटी व सूडबुद्धीने होऊ नये. पवार हे कधी ही शिखर बँकेचे संचालक व अध्यक्ष नव्हते. त्यामुळे त्यांचा या घोटाळ्याशी थेट संबंध सिद्ध होणे कठीण असल्याचे स्पष्ट केले आहे.
ईडीचा धाक दाखवून आपल्या राजकीय विरोधकांना संपवण्याचा हा कुटील प्रयत्न भाजप-शिवसेना सरकार करत आहे, असा आरोप करून सरकारची कारवाई निषेधार्ह व निंदनीय असल्याचे नमूद केले आहे. तसेच, सरकारला लोकशाही मागार्ने वाटचाल करण्याचा सल्ला दिला आहे.