डेल्टाचा धोका ; अकाेटात एक हजार लोकांची वैद्यकीय तपासणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 10:25 AM2021-08-14T10:25:29+5:302021-08-14T10:26:01+5:30

Delta Variant : एक हजार लोकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून सर्वच नागरिक ठणठणीत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Delta Variant threat; Medical examination of one thousand people in Akata! | डेल्टाचा धोका ; अकाेटात एक हजार लोकांची वैद्यकीय तपासणी!

डेल्टाचा धोका ; अकाेटात एक हजार लोकांची वैद्यकीय तपासणी!

Next

अकोला : कोरोनातून ठणठणीत झाल्यानंतर अकोटातील एका शिक्षक शिक्षक डेल्टा पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल बुधवारी रात्री उशिरा प्राप्त झाला. त्यानंतर खडबडून जागी झालेल्या आरोग्य यंत्रणेने दोन दिवसांत सुमारे ३०० घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात सुमारे एक हजार लोकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून सर्वच नागरिक ठणठणीत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

जिल्ह्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणात असून रुग्णसंख्या वाढीचा वेग मंदावला आहे. अशातच जून महिन्याच्या अखेरीस पॉझिटिव्ह आलेल्या अकोट येथील एका रुग्णाला डेल्टा व्हेरिएंटची लागण झाल्याचा अहवाल आरोग्य विभागाला बुधवारी रात्री उशिरा प्राप्त झाला. त्यामुळे खडबडून जागी झालेल्या आरोग्य यंत्रणेने गुरुवारी अकोट शहरातील संबंधित रुग्णाची वैद्यकीय चाचणी केली. हा रुग्ण पूर्णत: ठणठणीत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. शिवाय, रुग्ण राहत असलेल्या परिसरात सुमारे ३०० घरांचा सर्व्हे केला. या अंतर्गत एक हजार लोकांची वैद्यकीय चाचणी करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. वैद्यकीय चाचणीतील सर्वच नागरिक ठणठणीत असून एकालाही कोविडची लक्षणे नसल्याची माहितीदेखील आरोग्य यंत्रणेमार्फत देण्यात आली.

 

रक्तदाब, मधुमेहाचे आढळले ८० रुग्ण

 

डेल्टा प्लसच्या निमित्ताने गत दोन दिवसांत अकोटात आरोग्य विभागातर्फे सुमारे ३०० घरांचा सर्व्हे करण्यात आला. त्यामध्ये सुमारे एक हजार लोकांची तपासणी करण्यात आली असून एकालाही कोविडची लक्षणे नव्हती.

मात्र, ८० जणांना रक्तदाब आणि मधुमेह असल्याचे निष्पन्न झाले.

आरोग्य विभागामार्फत या रुग्णांवर पुढील उपचार केला जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 

लोकांमध्ये जनजागृती

सर्वेक्षणादरम्यान नागरिकांच्या वैद्यकीय तपासणीसोबतच आरोग्यविषयक जनजागृती करण्यात आली.

सर्दी, ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होत असल्याने आराेग्य यंत्रणेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

त्या अनुषंगाने स्थानिक वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक नागरिकांना देण्यात असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

विशेष खबरदारी म्हणून अकोट परिसरात वैद्यकीय सर्व्हे करण्यात आला. यामध्ये नागरिकांना कोविडची लक्षणे आढळून आली नाहीत. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही, मात्र प्रत्येकाने विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.

- डॉ. सुरेश असोले, जिल्हा आरोग्य अधिकारी, अकोला

Web Title: Delta Variant threat; Medical examination of one thousand people in Akata!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.