वर्हाडात ७.५ लाख शेतकर्यांचा पीक विमा!
By Admin | Updated: August 27, 2014 01:02 IST2014-08-27T01:02:46+5:302014-08-27T01:02:46+5:30
हवामान आधारित विम्यामध्ये दीड लाख शेतकर्यांचा सहभाग

वर्हाडात ७.५ लाख शेतकर्यांचा पीक विमा!
अकोला : अनियमित पावसामुळे पिकांची होणारी नुकसान भरपाई मिळावी, याकरिता पश्चिम विदर्भातील साडेसात लाख शेतकर्यांनी राष्ट्रीय पीक विमा योजनेंतर्गत जवळपास २२ कोटीचा पीक विमा काढला असून, हवामानावर आधारित पीक विमा काढण्यासाठी एक लाख ५९ हजार ४१४ शेतकर्यांनी सहभाग घेतला आहे. पश्चिम विदर्भात यावर्षी पावसाची अनिश्चितता वाढल्याने शेतकर्यांनी राष्ट्रीय पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे. सुरुवातीला ३१ जुलैपर्यंत विमा काढण्याची असलेली मुदत १६ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आल्याने यावर्षी जास्तीत जास्त शेतकर्यांना राष्ट्रीय पीक विमा योजनेत सहभागी होता आले असले तरी बँकाच्या जाचक अटीमुळे अनेक शेतकर्यांना यासाठी त्रास सहन करावा लागला. यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाला असून, पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने शेतकर्यांना यावर्षी पीक विमा काढणे संयुक्तित वाटल्याने यावर्षी शेतकर्यांची संख्या वाढली आहे. १६ ऑगस्टपर्यंत अकोला जिल्हय़ातील ६७ हजार १४ शेतकर्यांनी ७६ हजार ८0२ हेक्टरसाठी विमा काढला आहे. यासाठी शेतकर्यांनी २ कोटी ८७ लाख ३४ हजार एवढा विमा हप्ता भरला आहे. अमरावती जिल्हय़ातील १ लाख ५२ हजार ७८५ शेतकर्यांनी १ लाख ७ हजार २७२ हेक्टरसाठी ५ कोटी ५९ लाख ४९ हजार हप्ता भरू न राष्ट्रीय पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ९६ हजार २३ शेतकर्यांनी ९६ हजार ९0 हेक्टर क्षेत्राचा विमा काढला आहे. याकरिता या शेतकर्यांनी ५ कोटी ३७ लाख ८५ हजार विमा हप्त्यापोटी भरले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील १ लाख ७५ हजार ४१६ शेतकर्यांनी १ लाख २९ हजार ७0 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा काढला आहे. त्यापोटी ५ कोटी १५ लाख ३३ हजारांचा हप्ता भरला आहे. वाशिम जिल्हय़ात सर्वाधिक कमी म्हणजे ६४ हजार २५१ शेतकर्यांनीच या योजनेत सहभाग घेतला असून, ७४ हजार ४५२ हेक्टरसाठी या शेतकर्यांनी २ कोटी २४ लाख १0 हजार रुपयांचा विमा हप्ता भरला आहे.