‘क्राइम मिटिंग’ला ठाणेदारांच्या आधी पोलीस अधीक्षक हजर
By Admin | Updated: May 23, 2017 01:04 IST2017-05-23T01:04:49+5:302017-05-23T01:04:49+5:30
अकोला:‘क्राइम मिटिंग’ला ठाणेदारांच्या आधीच पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी हजेरी लावल्याने उशिरा येणाऱ्या ठाणेदार आणि पोलीस अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली.

‘क्राइम मिटिंग’ला ठाणेदारांच्या आधी पोलीस अधीक्षक हजर
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर गत आठ दिवसांमध्ये जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना भेटी देऊन तपासणी केल्यानंतर सोमवारी शहरासह जिल्ह्यातील ठाणेदार आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली होती; मात्र सदर बैठकीला ठाणेदारांच्या आधीच पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी हजेरी लावल्याने उशिरा येणाऱ्या ठाणेदार आणि पोलीस अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली.
पोलीस अधीक्षक दर महिन्यातून एक दिवस जिल्ह्यातील सर्वच उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणेदारांची क्राइम मिटिंग घेतात. या बैठकीमध्ये महिन्याभरातील गुन्हेगारीचा आढावा, घडलेल्या मोठ्या घटनांबाबत कोणती कारवाई केली, या संदर्भात माहिती घेण्यात येते. त्यामुळे दर महिन्याला घेण्यात येणारी क्राइम मिटिंग अधिकाऱ्यांसाठी फार महत्त्वाची असते. नव्याने पदभार स्वीकारणारे पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी सोमवारी पहिल्यांदाच क्राइम मिटिंग बोलाविली. या बैठकीची वेळ सकाळी दहा वाजता होती. त्यापूर्वी सर्वच अधिकाऱ्यांनी पोहोचणे बंधनकारक होते; मात्र शहरासह जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आणि ठाणेदार पोलीस अधीक्षकांपेक्षा उशिराने या बैठकीला पोहोचल्याने त्यांना या बैठकीचे किती गांभीर्य आहे, हे दिसून आले. या बैठकीच्या ५ मिनिट आधीच पोलीस अधीक्षक कलासागर पोलीस मुख्यालयातील सभागृहात पोहोचले. ते ज्यावेळी सभागृहात आले त्यावेळी तिथे कोणतेच अधिकारी आलेले नव्हते. त्यामुळे ही वार्ता मुख्यालयातील निरीक्षकांना कळताच त्यांनी शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील इतरही ठाणेदारांना यासंदर्भात माहिती देऊन तत्काळ पोहोचण्याच्या सूचना दिल्या. पोलीस अधीक्षक मुख्यालयात पोहोचल्याचे कळताच बैठकीला पोहोचण्यासाठी अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. बैठकीला सुरुवात होताच पोलीस अधीक्षक कलासागर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी आणि ठाणेदारांना परिसरातील अवैध धंदे बंद करण्याचे कडक आदेश दिले. त्यासोबतच जी घटना असेल त्याबाबत खरी माहिती देण्याचेही सांगितले. हद्दीमध्ये पायी पेट्रोलिंग करण्याचेही आदेश दिले असून, आगामी काळात येणाऱ्या धार्मिक सणांमध्ये गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याचे आदेश दिले. गुंडप्रवृत्तींच्या लोकांच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले.