लाचखोर विस्तार अधिकार्याविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: August 27, 2014 01:03 IST2014-08-27T01:03:34+5:302014-08-27T01:03:34+5:30
तेल्हारा पंचायत समितीमधील प्रकार; आरोपीचा शोध सुरू; घराची झाडाझडती

लाचखोर विस्तार अधिकार्याविरुद्ध गुन्हा
अकोला : गौण खनिज विभागामार्फत तेल्हारा तालुक्यातील एका गावासाठी आलेला दोन लाख रुपयांचा अतिरिक्त निधी वितरित करण्यासाठी लाच मागणारा तेल्हारा पंचायत समितीमधील विस्तार अधिकारी जितेंद्र नागे याच्याविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली असून, आरोपीचा शोध सुरू केला आहे. तेल्हारा तालुक्यातील एका गावाच्या विकास कामासाठी दोन लाख रुपयांचा अतिरिक्त निधी गौण खनिज विभागामार्फत तेल्हारा पंचायत समितीमध्ये जमा झाला होता. तेल्हारा पंचायत समितीमधील विस्तार अधिकारी जितेंद्र तुळशीराम नागे याने हा निधी मीच मंजूर करून आणला असल्याचे सांगून त्या मोबदल्यात २0 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. ही लाच देण्याच्या मन:स्थितीत नसल्याने संबंधित इसमाने या प्रकरणाची तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ५ ऑगस्ट रोजी तक्रारीची पडताळणी केली. या तक्रारीमध्ये तथ्य आढळल्यानंतर लाचेची रक्कम देण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार मंगळवारी संबंधित इसम २0 हजार रुपयांची लाचेची रक्कम घेऊन विस्तार अधिकारी जितेंद्र नागे याच्याकडे गेला. यावेळी नागे याला रंगेहात पकडण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही सापळा रचला; मात्र नागे याला तक्रारकर्त्याचा संशय आल्याने त्याने लाचेची रक्कम न घेताच घटनास्थळावरून पळ काढला. पुराव्यांच्या आधारे विस्तार अधिकारी जितेंद्र नागे याच्याविरुद्ध मंगळवारी तेल्हारा पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत असून, त्याच्या तेल्हारा येथील घराची झाडाझडतीदेखील घेण्यात येत आहे.