पोलिसावर गुन्हे दाखल करण्याचा न्यायालयाचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 12:08 IST2020-01-17T12:08:33+5:302020-01-17T12:08:41+5:30
ठाणेदार आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करूनही दखल न घेतल्यामुळे वकिलाने न्यायालयात धाव घेतली होती.

पोलिसावर गुन्हे दाखल करण्याचा न्यायालयाचा आदेश
अकोला : खदान पोलीस ठाण्यात मित्राला भेटण्यास गेलेल्या वकिलासोबत गैरव्यवहार करून खिशातून पैसे काढून घेणाऱ्या पोलिसाविरुद्ध एका वकिलाने न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने या पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. ठाणेदार आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करूनही दखल न घेतल्यामुळे वकिलाने न्यायालयात धाव घेतली होती.
खदान पोलीस ठाण्यात अॅड. अमोल क्षीरसागर यांनी १५ फेब्रुवारी २०१९ रोजी तक्रार दाखल केली होती. त्यांचे मित्र प्रशांत पडघन यांचा कौटुंबिक वाद सुरू होता. त्यामुळे त्यांना पोलीस ठाण्यात बोलावले होते. ठाण्यात मित्राला भेटण्यासाठी गेल्यानंतर विजय शेगोकार नामक कर्मचाºयाने त्यांना थांबवून असभ्य भाषेत व्यवहार केला, याचवेळी तेथे आकाश मानकर व इतर कर्मचाऱ्यांनी अश्लील शिवीगाळ करीत सरकारी कामांत अडथळा आणण्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. सोबतच मारहाण करून खिशातून पाचशे रुपये व मोबाइल काढून घेतला.
त्यानंतर अॅड. अमोल क्षीरसागर यांनी कलम १५६/३ च्या २९४, ३२३, ३४१, ३९२, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी करून न्यायालयात वैयक्तिक याचिका दाखल केली. या याचिकेवर तृतीय प्रथम श्रेणी न्यायाधीश के. पी. दवणे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून न्यायाधिशांनी आरोपी पोलीस कर्मचाºयांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे.