CoronaVirus in Akola : ४०० व्यक्ती निरीक्षणात; ७७ वैद्यकीय अहवाल प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 10:37 IST2020-04-15T10:37:40+5:302020-04-15T10:37:46+5:30
रुग्णांच्या निकट व दूरस्थरीत्या संपर्कात आलेल्या तब्बल ४०० व्यक्ती या वैद्यकीय निरीक्षणात आहेत.

CoronaVirus in Akola : ४०० व्यक्ती निरीक्षणात; ७७ वैद्यकीय अहवाल प्रलंबित
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोल्यात गेल्या तीन दिवसांपासून कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही; मात्र आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १३ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. या रुग्णांच्या निकट व दूरस्थरीत्या संपर्कात आलेल्या तब्बल ४०० व्यक्ती या वैद्यकीय निरीक्षणात आहेत. यापैकी ६० व्यक्ती या अत्यंत निकट संपर्कातील व्यक्ती आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल असलेल्या रुग्णांपैकी तब्बल ७७ रुग्णांचे अहवाल प्रलंबित असल्याने अकोलेकरांवरील धोका संपलेला नाही, त्यामुळे लॉकडाउनच्या नियमांचे पालन करण्याची गरज आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, अकोला शहरात पहिल्या टप्प्यात दोन जण पॉझिटिव्ह आढळले होते. त्यातील पहिल्या रुग्णाच्या निकट संपर्कातील १४ व्यक्ती होत्या तर दूरस्थ संपर्कातील ३० व्यक्ती होत्या. निकट असलेल्या व्यक्ती ह्या जास्त जोखमीच्या समजल्या जात असल्याने त्यांचेही घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.
त्यातील १० जणांचे अहवाल प्राप्त असून, तिघे पॉझिटिव्ह तर अन्य सात जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर कमी जोखमीच्या ३० व्यक्तींना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
अकोल्यातीलच दुसऱ्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या निकट संपर्कातील आठ व्यक्ती होत्या. त्यातील सात जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर कमी जोखमीच्या ४९ जणांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यानंतर बाळापूर येथून दाखल झालेल्या एका पॉझिटिव्ह रुग्णाच्या (मयत झालेल्या) निकट संपर्कात पाच जण होते. त्या पाचही जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तरीदेखील त्यांना संस्थागत अलगीकरणात तर अन्य २२ व्यक्ती जे दूरस्थ संपर्कात होते त्यांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. एकूण जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांच्या अत्यंत निकट संपर्कात ६० जण होते तर दूरस्थ संपर्कात ३४० जण आल्याचे प्रशासनाने शोधून काढले. हे सर्व जण सध्या संस्थागत वा गृह अलगीकरणात असून, ते वैद्यकीय निरीक्षणात आहेत.
पातुरात ३१ रुग्ण क्वारंटीन
पातूर येथील सात व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या होत्या. त्यांच्या निकट संपर्कात असलेल्या ३१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर दूरस्थ संपर्कातील २३९ जणांचेही गृह अलगीकरण करण्यात आले असून, ३१ जण अद्यापही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात संस्थागत अलगीकरणात आहेत.
खामगावच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील बाळापुरातील ‘ते’ दोघे निगेटिव्ह!
पश्चिम वºहाडातील बुलडाण्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या २१ झाली असून, बुलडाणा हे हॉटस्पॉट झाले आहे. याच रुग्णांपैकी खामगाव येथील एका पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेले बाळापूरचे दोघे जण असून, त्यांचेही अहवाल निगेटिव्ह आले आहेत; मात्र खबरदारीचा उपाय म्हणून तेही संस्थागत अलगीकरणात आहेत.