अकोला: जिल्ह्यात कोविडची दुसरी लाट ओसरली असून मृतकांची संख्याही कमी होत आहे. शुक्रवारी केवळ ९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, एकाही मृत्यूची नोंद नाही. तसेच दिवसभरात ७९ रुग्णांना डिस्चाज देण्यात आला. त्यामुळे अकोलेकरांना मोठा दिलासा मिळाला, तरी कोरोनाचे संकट अजूनही पूर्णत: टळले नाही. शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार, ९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये आरटीपीसीआरचे ८, तर रॅपिड ॲन्टिजन चाचणीचे एका पॉझिटिव्ह अहवालाचा समावेश आहे. नव्याने पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होत असताना बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी ७९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही आता २९३ वर आली आहे. मागील पाच महिन्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची ही सर्वात कमी असलेली संख्या आहे. तसेच शुक्रवारी एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्ह्यात आतापर्यंत ५७ हजार ६०८ रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी ५६ हजार १८७ जणांनी कोरोनावर मात केली. १,१२८ रुग्णांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला. कोरोनाचे संकट अजूनही पूर्णपणे संपलेले नाही. अशा परिस्थितीत नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याची गरज आहे.
तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण
तालुका - रुग्ण
बाळापूर - ०१
मूर्तिजापूर - ०१
बार्शीटाकळी - ०२
तेल्हारा - ०१
अकोला -०३ (ग्रामीण -०२, मनपा क्षेत्र - ०१)