‘फिट’च्या झटक्याने रस्त्यावर पडलेल्या तरुणाच्या मदतीसाठी धावले जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 15:30 IST2018-07-31T15:29:07+5:302018-07-31T15:30:11+5:30
राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला फिटचा झटका आल्याने मूर्च्छितावस्थेत पडून असलेल्या तरुणाला स्वत: उचलून आपल्या अंगरक्षकासोबत त्याला सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी पाठवून सहृदयतेचा परिचय दिला.

‘फिट’च्या झटक्याने रस्त्यावर पडलेल्या तरुणाच्या मदतीसाठी धावले जिल्हाधिकारी
- अतुल जयस्वाल
अकोला : अपघातात जखमी होऊन रस्त्यावर पडलेल्यांना किंवा विपन्नावस्थेत भटकणाऱ्यांना मदत करण्यासाठी सहसा कोणी पुढे येत नाही. अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र सोमवारी राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला फिटचा झटका आल्याने मूर्च्छितावस्थेत पडून असलेल्या तरुणाला स्वत: उचलून आपल्या अंगरक्षकासोबत त्याला सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी पाठवून सहृदयतेचा परिचय दिला.
जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय हे सोमवारी सकाळी ११ वाजताचे सुमारास डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित एका कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी त्यांच्या शासकीय वाहनाने जात होते. यावेळी त्यांच्यासोबत प्रभारी उप विभागीय अधिकारी अशोक अमानकर हे देखील दुसºया वाहनाने सोबत येत होते. राष्ट्रीय महामार्गावरील महाबीजच्या मुख्यालयासमोर एक तरुण रस्त्याच्या कडेला पडलेला असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने आपल्या चालकास गाडी थांबविण्याची सूचना केली. जिल्हाधिकाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न करता रस्त्याच्या कडेला पडून असलेल्या तरुणाच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी मूर्च्छितावस्थेत असलेल्या तरुणाला स्वत: उचलून अंगरक्षक व वाहनचालकाच्या सहाय्याने उप विभागीय अधिकाºयांच्या वाहनात बसविले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आपला अंगरक्षक प्रवीण सिरसाट यांना मूर्च्छितावस्थेत असलेल्या तरुणासोबत पाठवून त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांचा ताफा अचानक थांबलेला पाहून त्या ठिकाणी बघ्यांनीही गर्दी केली होती.
‘सर्वोपचार’मध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी केली मदत
फिट आलेल्या तरुणास सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते पराग गवई व त्यांचे मित्र धावून आले. या मंडळींनी तरुणास अपघात कक्षात नेले व तेथे डॉक्टरांना मदत केली. डॉक्टरांनी मूर्च्छितावस्थेत असलेल्या तरुणावर उपचार करून त्याला वार्ड क्र. नऊ मध्ये भरती केले. हा तरुण दर्यापूर तालुक्यातील भामोद येथील असल्याचे समजले. यावेळी डॉ. धायवट, डॉ. पुंडे, अधिपरिचारिका मनीषा राठोड, विश्वजित दांगट, नितीन डोंगरे, भाऊसाहेब अंभोरे, रवी पाटील, संतोष अलाट, आशिष वंजारी, राजेश इंगळे, अमित तेलगोटे, नीलेश वरोट यांचे सहकार्य लाभले.
कृषी विद्यापीठात कार्यक्रमासाठी जात असताना मला सदर युवक रस्त्याच्या कडेला पडून असल्याचे दिसले. एक माणूस म्हणून मी त्याला मदतीचा हात देऊन माझे कर्तव्यच पार पाडले. नागरिकांनी अपघातात जखमी झालेल्यांना किंवा इतरांना माणुसकी म्हणून मदत करायला हवी.
- आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हाधिकारी, अकोला.
/>