The choice of the Congress party leader goes to the state president's | काँग्रेसच्या गटनेता निवडीचा चेंडू प्रदेशाध्यक्षांच्या दालनात

काँग्रेसच्या गटनेता निवडीचा चेंडू प्रदेशाध्यक्षांच्या दालनात

अकोला : महापालिकेत काँग्रेस पक्षाच्या गटनेत्याची निवड करण्यासाठी सोमवारी शहरात दाखल झालेले पक्ष निरीक्षक जितेंद्र देहाडे यांनी पक्षातील सर्व नगरसेवकांसोबत सविस्तर चर्चा केली. चर्चेदरम्यान नगरसेवकांची मते लक्षात घेतल्यानंतर गटनेता निवड प्रक्रियेचा अहवाल प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्याकडे सादर केला जाणार असल्याची माहिती आहे.
महापालिकेत विरोधी पक्षाची जबाबदारी निभावणाऱ्या काँग्रेसचे १३ सदस्य असून, सत्ताधारी भाजपचे ४८ सदस्य आहेत. २0१७ मध्ये पक्षाने गटनेता पदावर साजिद खान पठाण यांची नियुक्ती केली होती. सत्ताधारी पक्षानंतर काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक असल्यामुळे निकषानुसार विरोधी पक्षाची धुरा काँग्रेसच्या खांद्यावर आली. गटनेते असलेल्या साजिद खान यांनी विरोधी पक्षनेता पदाची जबाबदारी स्वीकारली. गटनेता निवडीच्या कालावधीला अडीच वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेल्यामुळे पक्षात गटनेता निवड प्रक्रियेच्या हालचाली सुरू झाल्या. त्या पृष्ठभूमीवर काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी यांनी पक्ष निरीक्षक म्हणून अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र देहाडे यांची नियुक्ती केली. सोमवारी शहरात दाखल झालेल्या जितेंद्र देहाडे यांनी स्थानिक विश्रामगृह येथे पक्षातील सर्व नगरसेवकांसोबत सविस्तर चर्चा केल्याची माहिती आहे.


प्रदेशाध्यक्षांकडे सादर करणार अहवाल
पक्ष निरीक्षक जितेंद्र देहाडे यांनी नगरसेवकांसोबत केलेल्या चर्चेदरम्यान बहुतांश नगरसेवकांनी बदल आवश्यक असल्याचे मत नोंदविल्याची माहिती आहे. यासंदर्भातील अहवाल प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे सादर केला जाणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर थेट प्रदेश स्तरावरून गटनेता पदासाठी नगरसेवकाची नियुक्ती केली जाईल.

 

 

Web Title: The choice of the Congress party leader goes to the state president's

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.