अकोला ‘जीएमसी’ची विस्कटलेली घडी बसविण्याचे आव्हान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 13:28 IST2020-01-11T13:28:10+5:302020-01-11T13:28:19+5:30
नवनिर्वाचित पालकमंत्री बच्चू कडू जिल्ह्याचा आढावा घेणार असल्याची माहिती असून, आरोग्य विभागाची विस्कटलेली घडी बसविण्याचे त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे.

अकोला ‘जीएमसी’ची विस्कटलेली घडी बसविण्याचे आव्हान!
अकोला : वाढती रुग्णसंख्या अन् अपुरे मनुष्यबळ यामुळे सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णसेवा प्रभावित होत आहे. अशातच दलालांचाही बंदोबस्त होत नसल्याने रुग्णांची पिळवणूक मोठी डोकेदुखी ठरत आहे. येत्या १५ जानेवारी रोजी नवनिर्वाचित पालकमंत्री बच्चू कडू जिल्ह्याचा आढावा घेणार असल्याची माहिती असून, आरोग्य विभागाची विस्कटलेली घडी बसविण्याचे त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील रिक्त पदांचा प्रश्न गत अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. दुसरीकडे उपलब्ध मनुष्यबळाच्या तुलनेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर होताना दिसून येतो. शिवाय, स्वच्छतेचीही समस्या गंभीर झाल्याने येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह डॉक्टरांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत रुग्णांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याचा फायदा दलाल मंडळी घेत आहेत; मात्र त्यांचा बंदोबस्त होत नसल्याने सर्वोपचार रुग्णालय परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयाची विस्कटलेली घडी बसविणे गरजेचे आहे. येत्या १५ जानेवारी रोजी नवनिर्वाचित पालकमंत्री बच्चू कडू जिल्ह्याचा आढावा घेणार असल्याची माहिती आहे. आरोग्य विभाग हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय असून, सर्वोपचार रुग्णालयाची विस्कटलेली घडी ते बसविणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.
डॉक्टरांची खासगी प्रॅक्टिस
शासकीय रुग्णालयात सेवा देत असतानाही काही डॉक्टरांकडून खासगी प्रॅक्टिस केली जाते. शिवाय, येथील रुग्णांना ‘रेफर टु’ खासगी रुग्णालयाचाही सल्ला दिला जात असल्याचे अनेकदा समोर आले आहे. असे असतानाही अशा डॉक्टरांना शासकीय वेतनासोबत इतर भत्त्यांचा लाभ मिळत असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
पद निर्मितीअभावी रखडले सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन डिसेंबर २०१९ मध्येच करण्याबाबत जीएमसीला पत्र पाठविले होते; मात्र केंद्र सरकारकडून अद्यापही पद निर्मितीला मंजुरी दिली नाही. दुसरीकडे इमारतीचे काम जवळपास पूर्ण झाले असून, कोट्यवधींचे वैद्यकीय उपकरणेही दाखल झाली आहेत; मात्र तज्ज्ञ मनुष्यबळाअभावी या वैद्यकीय उपकरणांचे इन्स्टॉलेशन झालेले नाही.
या आहेत महत्त्वाच्या समस्या
- रुग्णालयात होणारी अन्नाची नासाडी.
- रुग्णांसाठी मार्गदर्शक फलकेच नाहीत.
- औषधांसाठी आर्थिक फटका.
- कोट्यवधींच्या वैद्यकीय उपकरणांचे इन्स्टॉलेशन नाही.
- जुनी इमारत धोकायक; स्ट्रक्चर आॅडिटचा अहवाल नाही.
- दलालांना डॉक्टरांचेच सहकार्य.