हवाला रॅकेटचा पर्दाफाश
By Admin | Updated: May 13, 2014 09:35 IST2014-05-13T09:35:21+5:302014-05-13T09:35:21+5:30
अशोकराज आंगडिया कुरिअरमधून २८ लाखांची रोकड जप्त; एक जण ताब्यात

हवाला रॅकेटचा पर्दाफाश
|
अकोला : जुना कॉटन मार्केटमधील अशोकराज आंगडिया कुरिअर्सद्वारे राज्याच्या विविध भागात हवालाच्या माध्यमातून पाठविण्यात येत असलेली सुमारे २८ लाख रुपयांची रक्कम सोमवारी दुपारी जप्त करण्यात आली. पैशांचा काळाबाजार म्हणून ओळख असलेल्या हवाला रॅकेटचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेने केला. या कारवाईमध्ये एका व्यावसायिकास ताब्यात घेण्यात आले आहे. ■ जुना कॉटन मार्केटमधील अशोकराज आंगडिया कुरिअरचा छापा यशस्वी होताच स्थानिक गुन्हे शाखेने बाजूलाच असलेल्या इंद्रपुरी कुरिअर सर्व्हिसेसमध्ये छापा मारला; मात्र त्यापूर्वीच या कुरिअर सर्व्हिसेसमधील कर्मचारी पळून गेले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने इंद्रपुरी कुरिअर सर्व्हिसेस कार्यालयाची झाडाझडती घेतली; मात्र त्यांना काहीही आढळून आले नाही. आयकर विभागाच्या परवानगीनंतर तपास ■ अशोकराज आंगडिया कुरिअर्समधून जप्त करण्यात आलेल्या २८ लाख रुपयांचा हवाला रकमेचा तपास करण्याची परवानगी आयकर विभागाकडून घेण्यात येणार आहे. आयकर विभागाच्या परवानगीनंतर या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येणार असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी सांगितले. १८ लाखांची रोखही आढळली ■ स्थानिक गुन्हे शाखेने जुना कॉटन मार्केटमधील कुरिअर सर्व्हिसेसमध्ये राबविलेल्या धाडसत्रात एका इन्व्हेस्टमेंटच्या कार्यालयातून १७ लाख ९४ हजार ५९२ रुपयांची रोखही आढळली. अशोकराज आंगडिया कुरिअर सर्व्हिसेस आणि त्यानंतर इंद्रपुरी कुरिअर सर्व्हिसेसच्या छाप्यानंतर पोलिसांनी बाजूलाच असलेल्या शशीकांत इन्व्हेंस्टमेंटमध्येही तपासणी केली. या तपासणीत पोलिसांना १७ लाख ९४ हजार ५९२ रुपयांची आणखी रोखही आढळली. ही रक्कम जप्त करून सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात आणल्यानंतर शशीकांत इन्व्हेंस्टमेंटचे संचालक नवीन गुप्ता यांनी सदर रकमेची रीतसर देयके आणि बँकेच्या सोमवारी करण्यात आलेल्या व्यवहाराच्या पावत्या पोलिसांना दाखविल्या. त्यानंतर पोलिसांनी तपासणी केली असता ही रक्कम सोमवारीच अकोला अर्बन बँकेच्या मुख्य शाखेतून काढण्यात आल्याचे समोर आले. पोलिसांनी चहूबाजूने तपासणी केल्यानंतर ही १८ लाख रुपयांची रक्कम अधिकृत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गुप्ता यांना ही रक्कम परत देण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 'व्हाइट कॉलर' येणार समोर ■ स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी जप्त केलेल्या हवाला रॅकेटच्या रकमेचा तपास सखोल केल्यानंतर अनेक व्हाइट कॉलरवाल्यांचे काळे धंदे समोर येणार असल्याची शक्यता पोलिस विभागाने वर्तविली आहे. हवाला रॅकेटची रक्कम पाठविण्याचा काळय़ा बाजारामध्ये शहरातील अनेक बड्या उद्योजक व व्यापार्यांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, त्यांच्या चेहर्यावरील पडदा लवकरच उठणार असल्याची माहिती आहे. कुरिअर सर्व्हिसेस बंद ■ अशोकराज आंगडिया कुरिअरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारून रक्कम जप्त करताच इतर बहुतांश कुरिअर सर्व्हिसेची कार्यालये बंद करण्यात आली होती. हवाला रॅकेटचा गोरखधंदा करणार्या कुरिअर सर्व्हिसेसच्या संचालकांनी कार्यालये बंद करून त्यांनी सोमवारी दुपारी शहराबाहेर पळ काढल्याची माहिती पोलिसांनी दिली. अशोकराज आंगडियाच्या छाप्यानंतर एलसीबीने विविध कुरिअर सर्व्हिसेसच्या कार्यालयांची तपासणी केली; मात्र बहुतांश कार्यालये बंद होती. |