आता प्रत्येक महिन्यात स्तनपान आठवडा; २०२२ पर्यंत राबविणार मोहीम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 13:27 IST2019-08-10T13:27:09+5:302019-08-10T13:27:15+5:30
केंद्रीय आरोग्य मंत्रालयांतर्गत आता दर महिन्याला स्तनपान आठवडा पाळण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

आता प्रत्येक महिन्यात स्तनपान आठवडा; २०२२ पर्यंत राबविणार मोहीम!
अकोला : बालकांच्या संपूर्ण पोषण आहाराचा एक भाग म्हणून देशभरात स्तनपानाला महत्त्व देण्यात येत असून, विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये १ ते ७ आॅगस्ट या कालावधीत स्तनपान आठवडा पाळण्यात आला; परंतु स्तनपानाविषयी अधिक जनजागृती व्हावी, तसेच स्तनपान ही सामाजिक जबाबदारी व्हावी, या उद्देशाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयांतर्गत आता दर महिन्याला स्तनपान आठवडा पाळण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
बदलत्या काळानुसार स्तनपानाकडे कुटुंबाचे दुर्लक्ष होते. मुळात पुरुषांसोबतच महिलाही नोकरीमध्ये व्यस्त झाल्याने हा प्रकार घडत आहे; परंतु त्याचा थेट इफेक्ट नवजात बालकांच्या पोषण आहारावर पर्यायाने बाळाच्या सर्वांगीण विकासावर होत असल्याचे वास्तव आहे. कामाचा व्याप आणि त्यामुळे स्तनपानासाठी वेळ मिळत नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यावर मात करून प्रत्येक बाळाला आईचे दूध मिळावे, यासाठी तिच्या कुटुंबासह प्रत्येक घटकाने याकडे एक सामाजिक जबाबदारी म्हणून बघण्याची गरज आहे. तिच्या कामाच्या ठिकाणीही तिला स्तनपानासाठी पाठिंबा द्यायला हवा, स्तनपानाला प्रोत्साहन मिळावे, याच दृष्टिकोनातून स्तनपानासंदर्भातील जनजागृती केवळ आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यातपुरता मर्यादित न राहता, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जनजागृती आठवडा म्हणून राबविण्याचा निर्धार केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. हा उपक्रम २०२२ पर्यंत राबविण्यात येणार असल्याची माहिती आहे.
‘सप्टेंबर’मध्येही स्तनपान जनजागृती
पोषण आहार कार्यक्रमांतर्गत सप्टेंबर महिन्यातदेखील अकोल्यात स्तनपानाविषयी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.
स्तनपानाविषयी जनजागृती व्हावी, यासाठी आरोग्य विभागाकडून विविध उपक्रम राबविल्या जात आहेत. नुकताच १ ते ७ आॅगस्ट या कालावधीत स्तनपान आठवडा राबविण्यात आला आहे; मात्र दर महिन्यात स्तनपान आठवडा राबविण्याबाबत अद्याप निर्देश आले नाहीत. तसे निर्देश येताच दर महिन्याला स्तनपान जनजागृती आठवडा राबवू.
- डॉ. आरती कुलवाल, अधीक्षिका, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला.