इंग्रजी शाळा प्रवेशासाठी हवे ब्लड रिलेशन
By Admin | Updated: April 26, 2017 01:42 IST2017-04-26T01:42:31+5:302017-04-26T01:42:31+5:30
शिक्षण महागले: शाळा प्रवेशाचे भूत पालकांच्या मानगुटीवर

इंग्रजी शाळा प्रवेशासाठी हवे ब्लड रिलेशन
अकोला : शहरातील अनेक शाळांमध्ये परीक्षा आटोपल्या आहेत, तर काही शाळांमध्ये परीक्षा सुरू आहेत. त्याअगोदरच पालकांची नव्या शैक्षणिक सत्रासाठी तयारी सुरू झाली आहे. सध्या पालकांचे आपल्या मुलाला दर्जेदार शिक्षण देण्यासाठी मिशन अॅडमिशन सुरू झाले आहे. सर्वच स्तरातील पालकवर्ग आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश मिळण्यासाठी जीवाचे रान करताना दिसतोय; परंतु शाळांचे डोनेशन, ब्लड रिलेशनसोबतच अनेक अटी शाळांनी घातल्यामुळे पालक त्रस्त झाले आहेत.
२७ जूनपासून नव्या शैक्षणिक सत्राला प्रारंभ होणार आहे. त्यापूर्वी शाळांनी प्रवेश क्षमता पूर्ण करण्याची तयारी केली आहे.
जवळपास सर्व पालकांनीसुद्धा शाळेत आपल्या मुलांचे प्रवेश निश्चित करून घेण्यात गुंतले आहेत. २५ टक्के आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालण्यासाठी पालक अक्षरश: धडपड करीत आहेत.
त्यासाठी वाट्टेल तेवढे डोनेशन देण्याची त्यांची तयारी दिसून येत आहे. शहरातील जिल्हा परिषद व महापालिकेच्या शाळांसोबतच खासगी इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे; परंतु शाळांनी जाचक अटी पालकांवर लादल्या आहेत. इंग्रजी माध्यमांच्या काही शाळांमध्ये मुलाला प्रवेश देण्यासाठी ब्लड रिलेशन आणि प्रवेशपूर्व परीक्षेसारख्या समस्यांना पालकांना सामोरे जावे लागत आहे. काही शाळांमध्ये तर प्रवेशपूर्व परीक्षा घेऊन उत्तीर्ण विद्यार्थ्यांची यादी फलकावर लावण्यात येते. ब्लड रिलेशनमधील नातेवाइकाला शाळेपर्यंत नेऊन प्रवेशासाठी गळ घालण्यात येत आहे.
आपल्या मुलांकडून प्रवेशपूर्व परीक्षेची तयारीसुद्धा करून घेताना काही दिसत आहेत, तर काही ठिकाणी पालकांसह विद्यार्थ्यांच्यासुद्धा मुलाखती घेतल्या जात आहेत. एवढी ही शाळा प्रवेशाची जीवघेणी स्पर्धा सुरू झाली आहे.
खासगी शाळांनी स्वत:साठी तयार केलेल्या नियमांकडे प्राथमिक शिक्षण विभाग डोळेझाक करीत असल्यामुळे गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
शिक्षण विभाग म्हणतो, पालक तक्रारच करीत नाहीत!
शहरातील अनेक खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी भरमसाट डोनेशन स्वीकारले जाते, तसेच ब्लड रिलेशन असेल तरच प्रवेशासाठी अर्ज करावा, अशा अटी शाळांकडून लादल्या जातात आणि पुढील वर्गासाठीही दरवर्षी भरमसाट शुल्क उकळल्या जाते, अशा पालकांच्या तक्रारी असतात. यासंदर्भात शिक्षण विभागासोबत संपर्क साधल्यावर पालक आमच्याकडे तक्रारच करीत नसल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.
वारंवार घडतो गुन्हा, शिक्षण विभाग ढिम्म
शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळांनी डोनेशन घेणे गुन्हा आहे; परंतु शाळांकडून दरवर्षी भरमसाट डोनेशन उकळल्या जाते, तसेच पुढील वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांकडूनही मोठ्या प्रमाणात शिक्षण शुल्क लाटल्या जाते. त्यातही काही शाळांकडून दरवर्षी १० ते १५ टक्के वाढ केली जाते; परंतु यासंदर्भात प्राथमिक शिक्षण विभागाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. पालकांकडून तक्रारीची अपेक्षा केली जाते.
सख्खा भाऊ, बहिणीलाच प्रवेश
अनेक इंग्रजी, सेमी इंग्रजी शाळांनी शिक्षण हक्क कायद्याला केराची टोपली दाखवित स्वत:चे नियम बनविले आहेत. ब्लड रिलेशनमधील सख्खा भाऊ, बहिणीलाच आम्ही प्रवेश देऊ, असे सांगितले जाते; परंतु चुलतभाऊ, बहिणीला मात्र शाळेत प्रवेश नाकारण्यात येतो, अशी परिस्थिती आहे. शाळांच्या स्वयंघोषित नियमांमुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागते.