भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 15:40 IST2025-12-19T15:37:27+5:302025-12-19T15:40:18+5:30
Akola Municipal Elections 2026: महाविकास आघाडीतील काँग्रेसने गुरुवारी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर आता आघाडीत सर्वांसाठी दरवाजे खुले असल्याचे स्पष्ट केले आहे.

भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
अकोला महापालिका निवडणूकीत महायुतीसाठी भारतीय जनता पक्ष तयार असला तरी पक्षाच्या यापूर्वी निवडून आलेल्या ५० पेक्षाही अधिक जागांवर पक्षाने दावा केला आहे. जनतेने सातत्याने कौल दिल्याने त्यानुसारच युतीची बोलणी होतील, असा पवित्रा भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी घेतला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेसने गुरुवारी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर आता आघाडीत सर्वांसाठी दरवाजे खुले असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु, महाविकास आघाडीतील पक्षाद्वारा एकमेकांकडून निमंत्रणाची प्रतीक्षा केली जात असल्याचे चित्र आहे.
महापालिका निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र येणार का, तिसरी आघाडी झाल्यास त्यामध्ये कोणाचा सहभाग असेल, या मुद्यांवरून सध्या शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपच्या काही नाराजांनी तिसऱ्या आघाडीची तयारी केली आहे. त्याचा परिणाम भाजपवर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पक्ष विरोधात काम केल्याने ज्यांना पक्षातून काढले आहे. त्या सर्वाची आता अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड सुरू असल्याचा टोला सावरकर यांनी लगावला आहे. तसेच महाविकास आघाडीतील घटकपक्ष उद्धवसेना आणि मनसे यांच्यात आघाडी झाल्याने आता महाविकास आघाडीचे काय? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
काँग्रेसकडेही ८० जागांवर उमेदवार
काँग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवारांच्या गुरुवारी मुलाखती घेतल्या. १४० पेक्षाही जास्त उमेदवारांनी सहभाग घेतला, तसेच गेल्या कार्यकाळातील १३ आणि त्यापूर्वीच्या ८ ते १० माजी नगरसेवकांनीही मुलाखती दिल्या. पक्षाकडे ५० पेक्षाही अधिक जागांवर दमदार उमेदवार असल्याचा दावा पक्षाचे समन्वयक प्रकाश तायडे यांनी केला आहे. इतर पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनीही मुलाखतीमध्ये सहभाग घेतल्याचे त्यांनी सांगितले.
मित्रपक्षांशी चर्चेला सुरुवात
काँग्रेस पक्षाकडे इच्छुक उमेदवारांची यादी तयार आहे, तसेच दावेदारी असलेले प्रभागही निश्चित झाले आहेत. पक्षाचे चित्र स्पष्ट झाल्याने मित्र पक्षांसोबत चर्चेचा मार्ग मोकळा झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटासोबत आधी बोलणे झाले आहे, तर उद्धवसेनेची तयारी असल्यास त्यांच्याशीही चर्चा केली जाणार आहे. त्याशिवाय, भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी सर्वच समविचारी पक्षांसोबत आघाडीचे दरवाजे खुले असल्याचेही तायडे यांनी सांगितले.