BJP MIM Alliance: अकोला जिल्ह्यातील अकोट नगर परिषदेत भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष निवडून आला असताना, सभागृहात बहुमत नसल्याने ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), राष्ट्रवादी काँग्रेस (शन पवार), शिंदेसेना, उद्धवसेना आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या नगरसेवकांची 'अकोट विकास आघाडी' या नावाने मोट बांधण्याचा भाजपच्या स्थानिक नेत्यांचा मनसुबा, भाजपा, एआयएमआयएम आणि उद्धवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशामुळे उधळला गेला आहे.
अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडे बुधवारी दाखल केलेला अकोट विकास आघाडी नोंदणीचा प्रस्ताव त्याच दिवशी दुपारी बारगळून औट घटकेचा ठरला. अकोट नगर परिषदेत नगराध्यक्ष म्हणून भाजपाच्या माया धुळे विजयी झाल्या आहेत.
भाजपाकडे अपुरे संख्याबळ
सभागृहाची सदस्यसंख्या ३३ आहे. त्यापैकी ११ नगरसेवक भाजपाचे आहेत. एवढ्या बळावर नगर परिषदेचे सभागृह, कामकाज चालवणे शक्य नसल्याने आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या नेतृत्वात अकोट विकास आघाडी गठीत करण्यात आली.
कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक?
भाजपाचे ११, एआयएमआयएमचे ५, राष्ट्रवादी (अजित पवार) चे २, राष्ट्रवादी (शरद पवार) चा १, उद्धवसेनेचे २, शिंदेसेनेचा १ आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे 3, अशा २५ नगरसेवकांच्या अकोट विकास आघाडीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे बुधवारी सकाळी दाखल करण्यात आला.
हा प्रकार माहीत होताच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेत काँग्रेस व एआयएमआयएम या पक्षांशी युती होणार नसल्याचे स्पष्ट केले.
असदुद्दीन ओवैसींनी खडसावले
एआयएमआयएमचे नेते खासदार असुदुद्दीन ओवैसी यांनीही नगरसेवकांना खडसावले. दुपारी घडलेल्या या वेगवान घडामोडीने एआयएमआयएमच्या पाच नगरसेवकांनी अकोट विकास आघाडीत त्यांचा सहभाग नसल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे आघाडी पूर्णत्वास येण्यापूर्वीच त्यात बिघाडी झाली.
भारसाकळेंना कारणे दाखवा
याप्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आमदार प्रकाश भारसाकळे यांना कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. अकोट नगर परिषदेत एआयएमआयएमसोबत युती करून भारतीय जनता पक्षाच्या ध्येय धोरणाला सुरुंग लावल्याचे म्हटले आहे. हे करताना कोणालाही विश्वासात घेतले नाही. त्यामुळे कारवाई का करू नये, याबाबत तातडीने खुलासा मागवला आहे.
Web Summary : BJP's Akot alliance with MIM and others failed after high command intervention. AIMIM withdrew support, and BJP issued a show-cause notice. The local alliance unraveled quickly.
Web Summary : भाजपा का एआईएमआईएम और अन्य के साथ अकोट गठबंधन शीर्ष हस्तक्षेप के बाद विफल हो गया। एआईएमआईएम ने समर्थन वापस ले लिया, और भाजपा ने कारण बताओ नोटिस जारी किया। स्थानीय गठबंधन जल्दी ही बिखर गया।