Big challenge for Akola GMC to start 'Noncovid Ward' | अकाेला‘जीएमसी’समोर 'नॉनकोविड वॉर्ड' सुरू करण्याचे मोठे आव्हान!

अकाेला‘जीएमसी’समोर 'नॉनकोविड वॉर्ड' सुरू करण्याचे मोठे आव्हान!

ठळक मुद्दे सहा महिन्यांपासून रुग्णसेवा प्रभावितनॉनकोविड रुग्णसेवा पुन्हा सुरू करण्याची गरज आहे.

अकाेला: कोरोनामुळे नॉनकोविड रुग्णसेवा मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली. त्यामुळे अनेकांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले, तर अनेक जण आर्थिक परिस्थिती नसल्याने सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णसेवा पूर्ववत सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहे; मात्र सद्यस्थितीत नॉनकोविड वॉर्ड पुन्हा सुरू करणे जोखमीचे असून, हे जीएमसी प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढीला काही प्रमाणात ब्रेक लागला आहे, तर उपचार सुरू असलेल्या रुग्णसंख्येतही लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे सर्वोपचार रुग्णालयात कोविड वॉर्ड बऱ्यापैकी रिकामे झाले असून, आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे. त्यामुळे प्रभावित झालेली नॉनकोविड रुग्णसेवा पुन्हा सुरू करण्याची गरज आहे; मात्र नोव्हेंबर महिन्यात कोरोनाची पुन्हा लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा परिस्थितीत नॉनकोविड रुग्णांसाठीचे वॉर्ड पुन्हा सुरू करणे, तसेच शस्त्रक्रिया सुरू करणे हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासमोरील मोठे आव्हान आहे.

मनुष्यबळ मोठी समस्या

कोविड रुग्णसंख्या कमी झाली; मात्र येत्या महिनाभरात रुग्णसंख्या वाढीचा अंदाज वर्तविला जात आहे. अशा परिस्थितीत नॉनकोविड वॉर्ड पुन्हा सुरू केल्यास कोविड वॉर्डकडे दुर्लक्ष होईल. तसेच अचानक कोविड रुग्णसंख्या वाढल्यास मनुष्यबळाचे पुन्हा नियोजन करणे कठीण जाणार असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मत आहे.

 

नॉनकोविड रुग्णसेवा सुरू करण्याची तयारी

सद्यस्थितीत नॉनकोविड रुग्णसेवा पूर्णपणे सुरू करणे शक्य नसले, तरी त्यावर काही तोडगा काढून सर्वसामान्यांसाठी ही सेवा सुरू करता येईल का, या संदर्भात जीएमसी प्रशासन प्रयत्नात असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दिवाळीपूर्वी या संदर्भात बैठक घेतली जाण्याची शक्यता आहे.

अनेकांना प्रतीक्षा

बंद असलेली नॉनकोविड रुग्णसेवा पुन्हा सुरू व्हावी, यासाठी अनेक रुग्ण प्रतीक्षेत आहे. आर्थिक बाजू बळकट नसल्याने अनेक रुग्ण खासगीत उपचार घेऊ शकत नाही. त्यामुळे सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णसेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी रुग्णांमधून होत आहे.

Web Title: Big challenge for Akola GMC to start 'Noncovid Ward'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.