विधानसभेच्या रणनितीसाठी बावनकुळे गुरुवारी अकाेल्यात, मतदार संघनिहाय आढावा बैठकांचे सत्र
By आशीष गावंडे | Updated: September 11, 2024 21:08 IST2024-09-11T21:06:34+5:302024-09-11T21:08:14+5:30
विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून आगामी नाेव्हेंबर महिन्यात निवडणूक हाेण्याचे संकेत आहेत.

विधानसभेच्या रणनितीसाठी बावनकुळे गुरुवारी अकाेल्यात, मतदार संघनिहाय आढावा बैठकांचे सत्र
अकाेला: आगामी विधानसभा निवडणुकीची रणनिती आखण्याच्या उद्देशातून भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाेबत संवाद साधण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे गुरुवार १२ सप्टेंबर राेजी अकाेल्यात दाखल हाेणार आहेत. यादरम्यान, ते विधानसभा मतदार संघनिहाय आढावा बैठका घेणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून आगामी नाेव्हेंबर महिन्यात निवडणूक हाेण्याचे संकेत आहेत. लाेकसभा निवडणुकीतील अनुभवानंतर भाजपने सर्वेच्या माध्यमातून राज्यात विधानसभेच्या २८८ जागांची चाचपणी करुन सर्वेचा अहवाल केंद्रिय व प्रदेश कार्यकारिणीकडे सादर केल्याची माहिती आहे. केंद्रिय स्तरावरुन प्राप्त सुचनेनुसार भाजपची राज्यातील यंत्रणा कामाला लागली असून महाराष्ट्रासाठी नियुक्त केलेल्या केंद्रिय प्रभारींचे मागील काही दिवसांपासून अकाेल्यात दाैरे वाढले आहेत. त्याच धर्तीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे १२ सप्टेंबर राेजी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघनिहाय आढावा घेण्यासाठी दाखल हाेत आहेत.
पदाधिकारी,कार्यकर्त्यांसाेबत थेट संवाद -
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे पक्ष संघटन, बुथ प्रमुखांपासून ते पन्ना प्रमुखांच्या संदर्भात पक्षाचे स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांसाेबत सविस्तर चर्चा करणार आहेत. सुरुवातीला मुर्तिजापूर त्यानंतर अकाेट येथील बैठकीत संवाद साधल्यानंतर शहरालगतच्या रिधोरा येथे अकोला पूर्व व अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. त्यानंतर सायंकाळी पारस येथे बाळापूर विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांसाेबत चर्चा करतील.