हवाला प्रकरणातील आरोपीला जामीन
By Admin | Updated: May 14, 2014 19:32 IST2014-05-13T22:27:12+5:302014-05-14T19:32:33+5:30
अवैधरीत्या हवालाचा व्यवसाय करणारा आरोपी नीमेश इंद्रवदन ठक्कर याला मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला कारागृहात रवानगी करण्याचे आदेश देत, त्याला जामीन मंजूर केला.

हवाला प्रकरणातील आरोपीला जामीन
अकोला: अवैधरीत्या हवालाचा व्यवसाय करणारा आरोपी नीमेश इंद्रवदन ठक्कर याला मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला कारागृहात रवानगी करण्याचे आदेश देत, त्याला जामीन मंजूर केला. हवाला प्रकरणाचा तपास आता कोतवाली पोलिसांकडे देण्यात आला आहे. कोतवाली पोलिस हवालातील एवढी मोठी रक्कम कोणाची आहे, त्याचा मालक कोण आहे, याचा शोध घेणार आहे आणि मिळालेल्या माहितीतून शहरातील काही दिग्गज व्यापार्यांची नावे आली आहेत. त्यामुळे या दिग्गजांच्या पोलिस मुसक्या आवळणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी जुना कापड बाजारातील नीमेश ठक्कर याच्या अशोकराज कुरियर सर्व्हिस प्रतिष्ठानावर छापा घालून रोख २७ लाख ७९ हजार ३५0 रुपये आणि टेलिफोन, नोटा मोजण्याची मशीनसह इतर साहित्य जप्त केले. नीमेश ठक्कर हा अवैधरीत्या हवालाचा व्यवसाय करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा घालून नीमेश इंद्रवदन ठक्कर याला अटक केली. त्याच्यावर कलम ४१(ड) नुसार गुन्हा दाखल केला होता; परंतु सोमवारी त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला तातडीने सवार्ेपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी उपचार केल्यानंतर त्याला शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी कोतवाली पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. त्याच्याकडून पोलिसांना शहरातील काही दिग्गज हवाला व्यापार्यांची नावे प्राप्त झाली आहेत. मंगळवारी दुपारी आरोपी नीमेश ठक्कर याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी करण्याचे आदेश देत नंतर त्याची जामिनावर मुक्तता केली. आरोपी नीमेश ठक्कर याच्याकडे सापडलेली २८ लाख रुपयांची रक्कम कुणाची, एवढी मोठी रक्कम तो कुठे पाठविणार होता, याचा तपास आता कोतवाली पोलिस करणार आहेत. या प्रकरणामध्ये आणखी किती लोकांची नावे समोर येतात, पोलिस त्यांच्यावर काय कारवाई करतात, याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.