सर्वोपचार रुग्णालयातून बालकाच्या अपहरणाचा प्रयत्न; चौकशी समिती गठित
By Atul.jaiswal | Updated: November 17, 2017 17:54 IST2017-11-17T17:48:15+5:302017-11-17T17:54:55+5:30
नवजात शिशू अतिदक्षता कक्षातून (एनआयसीयू)मध्ये एका वेडसर महिलेने दिवसाढवळ्या प्रवेश करून स्तनदा मातेकडून तिच्या बाळाला हिसकण्याचा प्रयत्न केल्याच्या गुरुवार, १७ नोव्हेंबर रोजी घडलेल्या प्रकाराची चौकशी करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने शुक्रवारी एक त्रिसदस्यी समिती गठित केली.

सर्वोपचार रुग्णालयातून बालकाच्या अपहरणाचा प्रयत्न; चौकशी समिती गठित
अकोला : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या बालरोग चिकित्सा विभागातील नवजात शिशू अतिदक्षता कक्षातून (एनआयसीयू)मध्ये एका वेडसर महिलेने दिवसाढवळ्या प्रवेश करून स्तनदा मातेकडून तिच्या बाळाला हिसकण्याचा प्रयत्न केल्याच्या गुरुवार, १७ नोव्हेंबर रोजी घडलेल्या प्रकाराची चौकशी करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने शुक्रवारी एक त्रिसदस्यी समिती गठित केली.
गुरुवारी दुपारी जुनिसीया असे स्वत:चे नाव सांगत असलेल्या एका परप्रांतीय वेडसर महिलेने सर्वोपचार रुग्णालयाच्या बालरोग चिकित्सा विभागातील वार्ड क्र. २३ मध्ये असलेल्या ‘एनआयसीयू’मध्ये प्रवेश करून सोनू संदीप अंबडारे (२६, रा. नागापूर-बोर्डी, ता. अकोट, जि. अकोला)यांच्याकडून त्यांच्या २१ दिवसांच्या बाळाला हिसकण्याचा प्रयत्न केला होता; परंतु कर्तव्यावर असलेल्या अधिपरिचारिका जया खांबलकर आणि सुरक्षा रक्षकांनी हा प्रयत्न हाणून पाडला व तीला पोलिसांच्या ताब्यात दिले. सर्वोपचार रुग्णालयाची कडक सुरक्षा व्यवस्था भेदून घडलेल्या या प्रकाराची वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. घडलेला प्रकार अतीशय गंभीर असल्यामुळे प्रभारी अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांनी वैद्यकीय अधिक्षक डॉ. दिनेश नेताम यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती गठीत केली. या समितीमध्ये बालरोग चिकित्सा विभाग प्रमुख डॉ. अभय बागुल व मेट्रन ग्रेसी मरियम यांचा समावेश आहे. येत्या सोमवार, मंगळवारपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याचे प्रभारी अधिष्ठा डॉ. कुसुमाकर घोरपडे यांनी सांगितले.