अकोला: शहरातील जठारपेठ चौकात भरदिवसा एका २२ वर्षीय तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. पीडित तरुणी शहरातील एका ‘हेल्थ इन्शुरन्स’ कंपनीत युनिट मॅनेजर पदावर कार्यरत आहे. याप्रकरणी ८ जुलै राेजी रात्री उशिरा सिव्हील लाइन पाेलिस ठाण्यात कंपनीच्या एजंटविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश ठाकूर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. १६ जून २०२५ रोजी, पीडित तरुणी नेहमीप्रमाणे ड्युटीवर हजर होती. आरोपी गणेश ठाकूर हा कंपनीत ‘कस्टमर एजंट’म्हणून कार्यरत आहे. तिला ‘कस्टमर कॉल’ असल्याचे सांगून चारचाकी वाहनातून बाहेर नेले. सायंकाळी साडेसहा वाजता, जठारपेठ चौकात एका दूध डेअरीसमोर कार थांबवून आरोपी मागच्या सीटवर जाऊन बसला आणि तिचा हात पकडून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने आरडाओरड केल्यावर त्याने तोंड दाबून मारहाण केली. मात्र, आत्मविश्वास आणि प्रसंगावधान राखत तिने आरोपीच्या गुप्तांगावर लाथ मारली आणि कारमधून बाहेर पडून सुटका केली. घटनेनंतर आरोपीने पीडितेला मोबाईलवरून धमक्या देत आत्महत्येच्या आरोपात अडकवण्याचा प्रयत्न केला. अखेर तिने ८ जुलै राेजी रात्री सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी गणेश ठाकूरविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७५(२), ७६, ३५१(२)(३) अंतर्गत गुन्हा दाखल करून आराेपीला अटक केली. तसेच त्याचे वाहन जप्त करण्यात आले आहे. सिव्हील लाइन पाेलिसांचा धाक कागदावरया घटनेमुळे शहरातील तरुणी, शाळकरी विद्यार्थीनी व महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिकच गंभीर बनल्याचे समाेर आले आहे. पोलिसांनी केवळ गुन्हे नोंदवून जबाबदारी संपवण्याचा काळ आता गेला आहे. आता वेळ आहे, गुन्हेगारांच्या मनात पोलिसांचा खऱ्या अर्थाने धाक निर्माण करण्याची! परंतु मागील घटना पाहता सिव्हील लाइन पाेलिसांचा धाक कागदापुरता मर्यादित असल्याचे बाेलल्या जात आहे.