भाजप पदाधिकाऱ्याचा मनपात आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 10:02 AM2021-05-11T10:02:18+5:302021-05-11T10:02:34+5:30

Akola News : आशिष ढाेमणे यांनी ही कार्यवाही तातडीने बंद करण्याची मागणी करीत साेमवारी दुपारी मनपा आयुक्तांच्या कार्यालयासमाेर आत्मदहनाचा प्रयत्न केला.

Attempt of self-immolation of BJP office bearers | भाजप पदाधिकाऱ्याचा मनपात आत्मदहनाचा प्रयत्न

भाजप पदाधिकाऱ्याचा मनपात आत्मदहनाचा प्रयत्न

Next

अकाेला: शहरावर काेराेनाचे संकट घाेंगावत असताना महापालिका प्रशासनाने जनता भाजी बाजारात वाणिज्य संकुल उभारण्याच्या उद्देशातून बाजारातील व्यावसायिकांना सुनावणीसाठी नाेटिसा दिल्या़ काेराेना काळात सुनावणी घेण्याची घाई कशासाठी,असा सवाल उपस्थित करीत भाजपच्या कामगार आघाडीचे पश्चिम विदर्भ प्रभारी अध्यक्ष आशिष ढाेमणे यांनी ही कार्यवाही तातडीने बंद करण्याची मागणी करीत साेमवारी दुपारी मनपा आयुक्तांच्या कार्यालयासमाेर आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित सुरक्षा रक्षकांनी ढाेमणे यांचा प्रयत्न उधळून लावत त्यांना पाेलिसांच्या स्वाधीन केले.शहरातील जनता भाजी बाजारची जागा, जुने बस स्थानकाची जागा व बाजाेरिया मैदानाच्या जागेवर आरक्षण आहे़ या तीनही जागेच्या हस्तांतरणाचा प्रस्ताव मनपा प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे साेपवला हाेता़ यामध्ये जिल्हा प्रशासनाने बाजाेरिया मैदानाची जागा वगळून उपराेक्त दाेन जागेचा मनपाला आगाउ ताबा दिला़ याबदल्यात मनपाने २६ काेटींचे शुल्क जमा केले़ जनता भाजी बाजारमध्ये किरकाेळ व्यावसायिक पाेटाची गुजरान करीत असताना मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी व्यावसायिकांना दुकाने हटविण्याच्या उद्देशातून नाेटिसा जारी केल्या़ काेराेनाच्या संकटात मनपाची भूमिका याेग्य नसल्याचा आराेप करीत सदर कार्यवाही त्वरित बंद करण्याच्या मागणीसाठी साेमवारी भाजपच्या कामगार आघाडीचे पश्चिम विदर्भ प्रभारी अध्यक्ष आशिष ढाेमणे यांनी मनपा आयुक्त निमा अराेरा यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला़ आयुक्तांनी भेट नाकारल्यानंतर ढाेमणे यांनी साेबत आणलेले पेट्राेल मिश्रीत रसायन अंगावर ओतून आयुक्तांच्या कार्यालयासमाेर आत्मदहनाचा प्रयत्न केला़ त्यावेळी उपस्थित सुरक्षा रक्षकांनी ढाेमणे यांचा प्रयत्न हाणून पाडत त्यांना सिटी काेतवाली पाेलिसांच्या ताब्यात दिले़

 

सुनावणी स्थगित

मनपाने व्यावसायिकांना १०, ११ व १२ मे राेजी मनपात सुनावणीसाठी हजर राहण्याच्या नाेटिसा दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने ९ मे पासून जिल्ह्यात टाळेबंदी लागू केली़ टाळेबंदी लागू झाल्यामुळे प्रशासनाने १० मे राेजी सकाळी सुनावणी स्थगित केल्याचे पत्र जारी केले़

Web Title: Attempt of self-immolation of BJP office bearers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.