अर्ज ३३ हजार, अनुदानित बियाणे फक्त १५०० शेतकऱ्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 10:25 AM2021-06-03T10:25:44+5:302021-06-03T10:25:52+5:30

Agriculture Sector News : कृषी सेवा केंद्रावर महाबीजचे सोयाबीन बियाणेही मिळत नसल्याने शेतकरी चिंतित आहे.

Application 33 thousand, subsidized seeds to only 1500 farmers | अर्ज ३३ हजार, अनुदानित बियाणे फक्त १५०० शेतकऱ्यांना

अर्ज ३३ हजार, अनुदानित बियाणे फक्त १५०० शेतकऱ्यांना

Next

- सागर कुटे

अकोला : अनुदानित बियाण्यांसाठी महाडीबीटी पोर्टलमार्फत जिल्ह्यातील ३३ हजार १७० शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. यामध्ये लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली असून, केवळ १ हजार ५१४ शेतकऱ्यांना अनुदानावर सोयाबीन बियाणे देण्यात येत आहे, तर कृषी सेवा केंद्रावर महाबीजचे सोयाबीन बियाणेही मिळत नसल्याने शेतकरी चिंतित आहे.

यंदा सोयाबीनला चांगला दर मिळाल्याने बियाण्यांचे दरही वाढले आहेत. मात्र, महाबीजने बियाण्यांचे दर कायम ठेवले असून, जिल्ह्यात महाबीज बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलमार्फत अर्ज करून अनुदानित बियाणे मिळत आहे. याकरिता जिल्ह्यातील ३३ हजार १७० शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केले होते. या शेतकऱ्याची निवड लॉटरी पद्धतीने झाली आहे; परंतु यामध्ये केवळ १५०० शेतकऱ्यांची निवड सोयाबीन बियाण्यांसाठी झाल्याने शेतकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे, तर २ हजार २०६ शेतकऱ्यांची डाळवर्गीय बियाण्यांसाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे, महाबीजकडून डीलरला वितरित बियाणेसुद्धा संपले असल्याचे बोर्ड लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

 

तालुकानिहाय शेतकऱ्यांची झालेली निवड

अकोला २२४

अकोट २१७

बाळापूर २२७

बार्शीटाकळी २०६

मूर्तिजापूर २२४

पातूर २०४

तेल्हारा २१२

परमीट आणल्यावर बियाणे

लॉटरीमध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांना एसएमएस प्राप्त झाले आहेत. या शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून परमीट मिळणार असून, परमीट घेऊन संबंधित कृषी केंद्रावर गेल्यास शेतकऱ्यांना सोयाबीनचे अनुदानित बियाणे प्राप्त होणार आहे.

 

सोयाबीनचे १५८ वाण ठेवावे लागले राखून

कृषी सेवा केंद्र चालकांना महाबीजचे प्रमाणात सोयाबीन बियाणे १५८ वाण वितरित करण्यात आले होते; परंतु हे वाण अनुदानित पद्धतीने महाडीबीटी पोर्टलवरील शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार असल्याने विक्री करण्यास मनाई करण्यात आली होती. त्यामुळे हे ‌वाण कृषी सेवा केंद्र चालकांना विकता आले नाही.

महागडे बियाणे विकत घेण्याची वेळ

सोयाबीन बियाण्यांच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांवर महागडे बियाणे विकत घेण्याची वेळ आली आहे. कृषी सेवा केंद्रांवर ३३०० रुपयांमध्ये सोयाबीनची बॅग मिळत आहे. त्यामुळे लागवड खर्चही वाढला आहे.

 

महाबीज बियाण्यांची २२५० रुपयांची बॅग उपलब्ध नाही. मात्र, खासगी कंपनीचे ३००० ते ३५०० रुपये किमतीचे बियाणे उपलब्ध आहे. यातून या शासकीय कंपन्या शेतकऱ्यांच्या की व्यापाऱ्यांच्या हा प्रश्न निर्माण होत आहे. यंदा शेतकऱ्याचे उत्पन्न न दुप्पट करता बियाणे, खताचे भाव दुप्पट वाढविले आहेत.

- मनोज तायडे, संयोजक, शेतकरी जागर मंच

सोयाबीनचे सर्व बियाणे काळ्याबाजारात विकण्याचा कार्यक्रम सुरू आहे. लॉटरी पद्धतीने वितरित होणारे बियाणे एका गावात एका शेतकऱ्याला मिळते की, नाही सांगता येत नाही. त्या तुलनेत खासगी कंपनीचे बियाणे ३२००-३३०० रुपयांनी विकत मिळत आहे.

- कृष्णा अंधारे, संयोजक, शेतकरी जागर मंच

Web Title: Application 33 thousand, subsidized seeds to only 1500 farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.