अकोला पोलीस दलात खळबळ! महिला आरोपीकडे मुलीची मागणी करणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे निलंबन
By सचिन राऊत | Updated: April 1, 2026 12:13 IST2026-04-01T12:11:26+5:302026-04-01T12:13:24+5:30
Akola Police Suspension News: अकोला सायबर पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश जाधव याने महिला आरोपीकडे मुलीची मागणी केल्याने त्याचे निलंबन करण्यात आले आहे. ८० लाखांच्या फसवणूक प्रकरणातील ही धक्कादायक घटना.

अकोला पोलीस दलात खळबळ! महिला आरोपीकडे मुलीची मागणी करणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे निलंबन
- सचिन राऊत
अकोला : सायबर पोलिसांनी ८० लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात पालघर येथून दोन आरोपींना अटक केली. यामध्ये एका महिला आरोपीचा समावेश आहे. अटकेतील महिलेला सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश जाधव याने 'तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव दहा हजार रुपये देतो' आणि गुन्ह्यातून वाचविण्यासाठी प्रयत्नही करतो अशी अजब गजब मागणी बुधवारी सकाळी केली. हा प्रकार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कानावर जाताच त्यांनी तातडीने दखल घेत राजेश जाधव याचे तडकाफडकी निलंबन केले आहे.
सायबर गुन्ह्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश मिळवत सायबर पोलिसांनी तब्बल ८० लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणाचा छडा लावत पालघर येथून दोन आरोपींना अटक केली. या कारवाईत एका महिला आरोपीचाही समावेश असून, प्राथमिक तपासात या टोळीने विविध माध्यमांतून नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
दरम्यान, या प्रकरणाच्या तपासादरम्यान एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. अटकेतील महिला आरोपीशी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश जाधव याने अत्यंत अयोग्य वर्तन करत ‘तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव, मी तुला दहा हजार रुपये देतो’ अशी अमानवी व लज्जास्पद मागणी केल्याचा आरोप पुढे आला आहे. एवढेच नव्हे, तर संबंधित महिलेला गुन्ह्यातून वाचविण्यासाठी मदत करण्याचे आमिषही दाखविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. पोलिस दलाच्या प्रतिमेला धक्का देणाऱ्या या कृत्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश जाधव याचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. तसेच त्याच्याविरुद्ध स्वतंत्र फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे पोलिस यंत्रणा सतर्क असून आरोपींविरुद्ध कठोर कारवाई केली जात आहे. मात्र, तपास प्रक्रियेतच काही अधिकाऱ्यांकडून होणारे असे गैरवर्तन गंभीर चिंतेचा विषय ठरत आहे. या घटनेमुळे पोलिस विभागात खळबळ उडाली असून, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी अधिक कडक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असून, पुढील तपास सुरू आहे.