शासकीय दूध डेअरीतील वायू गळती नियंत्रणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 13:12 IST2019-01-19T13:11:20+5:302019-01-19T13:12:11+5:30
अकोला : येथील शासकीय दूध डेअरी प्रकल्पातील प्रशीतन यंत्रणेतून गुरुवारी झालेली अमोनिया वायूची गळती नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला यश आले आहे.

शासकीय दूध डेअरीतील वायू गळती नियंत्रणात
अकोला : येथील शासकीय दूध डेअरी प्रकल्पातील प्रशीतन यंत्रणेतून गुरुवारी झालेली अमोनिया वायूची गळती नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला यश आले आहे. प्रशीतन यंत्रणा दुरुस्तीचे काम शुक्रवारी हाती घेण्यात आले असून, येत्या दोन ते तीन दिवसांत यंत्रणेचे कामकाज पूर्ववत सुरू होईल, असे दुग्धशाळा व्यवस्थापकाकडून सांगण्यात आले.
शासकीय दूध योजना प्रकल्पात दुधावर प्रक्रिया करून भुकटीत रूपांतर केले जाते. या प्रक्रियेसाठी अमोनिया वायूवर आधारित प्रशीतन यंत्रणा, हॉट वॉटर यंत्रणा, प्रक्रिया संयंत्र व होमजीनायजर यंत्रणा कार्यरत असते. गुरुवार, १७ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता प्रशीतन विभागातील अॅटमॉसफेरिक कंडेन्सरच्या एका कॉइलच्या व्हॉल्व्हमधून अमोनिया वायू गळती सुरू झाल्याचे यंत्र चालकाच्या निदर्शनास आले. तातडीची उपाययोजना म्हणून इतर व्हॉल्व्ह बंद करण्यात आले. तोपर्यंत वायू वातावरणात पसरल्यामुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचा व डोळ्यांचा त्रास सुरू झाला. अग्निशामक यंत्रणेला पाचारण करण्यात आले. पाण्याचा मारा केल्यानंतर व यंत्रणेत असलेला वायू दुसऱ्या रिसिव्हरमध्ये पाठविण्यात आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
अमोनिया यंत्रणा ही प्रेशरवर चालणारी असून, लिकेज झाल्यास त्या ठिकाणातून हा वायू बाहेर पडतो. पाण्याचा मारा केल्यास तो वायू विरघळतो. ही कार्यपद्धती योजण्यात येऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे, असे दुग्धशाळा व्यवस्थापकांनी सांगितले.