मूर्तिजापूर (जि.अकोला) : मुंबई-अमरावती दरम्यान धावणाऱ्या अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेच्या अप-डाऊन मार्गावरील वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली आहे. ही घटना शनिवारी घडली असून अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर रेल्वे स्थानकाजवळ सदरचा प्रकार समोर आला. या तांत्रिक बिघाडामुळे मुंबई आणि हावडाकडे जाणाऱ्या विविध महत्त्वाच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले असून, प्रवाशांचे प्रचंड हाल सुरू झाले आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ही वायर तुटल्यामुळे अमरावती एक्सप्रेस, विदर्भ एक्सप्रेस, अमरावती-पुणे एक्सप्रेस, नागपूर-पुणे एक्सप्रेस अशा अनेक गाड्यांना नजीकच्या स्थानकांवर थांबवण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू केले असून, किमान दोन तासांचा कालावधी लागणार असल्याचे प्राथमिक अंदाज आहेत.
रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओव्हरहेड वायरमधील हा तांत्रिक बिघाड अचानक घडला असून, वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक गाड्या मार्गातच अडकून पडल्या आहेत. काही गाड्यांना नागपूर, अकोला, मंढळा रोड, बदलापूर आणि शेगाव स्थानकांवर तात्पुरते थांबवण्यात आले आहे. यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आणि संभ्रमाचं वातावरण पसरलं आहे.
अनेक ठिकाणच्या प्रवाशांना त्रास
मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, हावडा या प्रमुख शहरांमध्ये प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना या गोंधळाचा फटका बसला आहे. अनेकांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत रेल्वे व्यवस्थेवरील संताप व्यक्त केला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने काही ठिकाणी अल्पोपहार आणि पाण्याची व्यवस्था केली आहे, मात्र ती अपुरी असल्याच्या तक्रारीही येत आहेत.
रेल्वेच्या इंजिनियरिंग आणि तांत्रिक पथकांनी घटनास्थळी दाखल होत ओव्हरहेड वायर दुरुस्तीचं काम वेगाने सुरू केलं आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दोन तासांनंतर वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता आहे. मात्र, काही गाड्यांचे वेळापत्रक पूर्णतः कोलमडल्याने पुढील काही तास प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.
ही घटना पुन्हा एकदा भारतीय रेल्वेच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर प्रश्नचिन्ह उभं करते. वारंवार होणारे तांत्रिक बिघाड, खराब देखभाल आणि तत्काळ पर्यायांची अनुपस्थिती यामुळे प्रवाशांना वेठीस धरले जात असल्याचं चित्र आहे.
यासंदर्भात अधिकृत माहिती अद्याप रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आलेली नाही. मात्र, अंबा एक्सप्रेससह इतर गाड्यांच्या नियमिततेसाठी प्रशासन तत्काळ उपाययोजना करत आहे, असे सूत्रांकडून समजते.