अकोल्याच्या साहिल इंगळेचा लघुपट 'कान्स' महोत्सवात देशातून एकमेव लघुपटाची निवड; बंगाली व नायजेरीयन भाषेत लघूपट
By अतुल जैस्वाल | Updated: May 7, 2025 14:20 IST2025-05-07T14:20:16+5:302025-05-07T14:20:47+5:30
साहिल सध्या कोलकात्यातील सत्यजीत रे फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये ‘प्रोड्युसिंग फॉर फिल्म अँड टेलिव्हिजन’ या कोर्सचे पदव्युत्तर शिक्षण घेत आहे.

अकोल्याच्या साहिल इंगळेचा लघुपट 'कान्स' महोत्सवात देशातून एकमेव लघुपटाची निवड; बंगाली व नायजेरीयन भाषेत लघूपट
अकोला : अकोल्यातील साहिल इंगळे या तरुणाने निर्मित केलेल्या ‘अ डॉल मेड अप ऑफ क्ले’ या लघुपटाची निवड जगप्रसिद्ध कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२५ साठी झाली आहे. विशेष म्हणजे, यंदा भारतातून निवडलेला हा एकमेव लघुपट आहे.
साहिल सध्या कोलकात्यातील सत्यजीत रे फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये ‘प्रोड्युसिंग फॉर फिल्म अँड टेलिव्हिजन’ या कोर्सचे पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. लघुपटाची निर्मिती साहिलने तर दिग्दर्शन इथिओपियाच्या कोकोब टेस्फे या विद्यार्थ्याने केले आहे. चित्रपट बंगाली आणि युरोबा (नायजेरियन) भाषांमध्ये तयार करण्यात आला आहे. साहिल यापूर्वी पुणे विद्यापीठातून जनसंज्ञापनात पदवी घेतली आहे. देशभरातील २,७०० हून अधिक विद्यार्थ्यांनी पाठवलेल्या चित्रपटांतून निवडलेल्या १६ चित्रपटांत याचा समावेश झाला आहे. साहिल उद्या फ्रान्सला रवाना होत आहे.
फुटबॉलपटू बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवकाचा संघर्ष
कथेचा केंद्रबिंदू एक नायजेरियन युवक आहे, जो भारतात फुटबॉलपटू बनण्याचे स्वप्न पाहतो आणि त्यासाठी वडिलांची शेती विकतो. संघर्ष आणि स्वप्नपूर्तीची ही संवेदनशील मांडणी आहे. संस्थेची उपकरणे वापरून शून्य खर्चात हा चित्रपट तयार झाला असून, इच्छा आणि कल्पकतेच्या जोरावर दर्जेदार निर्मिती शक्य आहे, असे साहिलने सांगितले.
मी पुणे विद्यापीठातून जनसंज्ञापन विषयात पदवी घेतली. जनसंज्ञापनात चित्रपटाची ताकद काय असते, याची जाणीव झाल्यावर मी चित्रपट शिक्षणाकडे वळलो. लघुपट या श्रेणीत निवडला गेलेला आमचा देशातील एकमेव चित्रपट आहे.
- साहिल इंगळे, अकोला