अकोला: शहरात जंतुनाशक फवारणीला वेग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 13:27 IST2020-03-28T13:27:28+5:302020-03-28T13:27:32+5:30
नगरसेवकही प्रभागात ठिकठिकाणी फवारणी करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

अकोला: शहरात जंतुनाशक फवारणीला वेग!
अकोला: संसर्गजन्य कोरोना विषाणूचा प्रसार टाळण्याच्या उद्देशातून महापालिका प्रशासनाद्वारे शहरातील मुख्य रस्त्यांवर अत्याधुनिक मशीनद्वारे जंतुनाशक फवारणीला शुक्रवारपासून सुरुवात करण्यात आली. याव्यतिरिक्त नगरसेवकही प्रभागात ठिकठिकाणी फवारणी करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
कोरोना विषाणूचे आयुर्मान लक्षात घेता, प्रशासकीय यंत्रणेसह नागरिकांनासुद्धा खबरदारी घेण्याची नितांत आवश्यकता आहे. या विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी गर्दी व एकमेकांसोबत संपर्क टाळणे, हाच प्राथमिक व प्रभावी उपाय असल्यामुळे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाकडूनही वारंवार काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. त्या पृष्ठभूमीवर महापालिकेच्या स्वच्छता विभागाच्यावतीने शहरातील मुख्य रस्त्यांवर जंतुनाशक फवारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. यामध्ये प्रभागातील अंतर्गत भागात पाच ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात आली असून, शहरातील ९ मीटरपेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्यांवर झोननिहाय फवारणी करण्याचे निर्देश आहेत. फवारणीसाठी ५०० लीटर क्षमता असलेले ४ प्रोटेक्टर मशीनद्वारे किटाणू व जंतुनाशक (सोडियम हाइपोक्लोराईड) औषधीचा वापर केला जात आहे. श्री प्राजल गोपनारायण, आदर्श फार्म सर्व्हिसेस (युनिमार्ट अकोला), यू.पी.एल. इंडिया लिमिटेड, मुंबई यांनी अत्याधुनिक फवारणी यंत्र नि:शुल्क उपलब्ध करून दिले आहेत. त्यावरील संचालकाला मनपाकडून मानधन दिले जाईल.
नगरसेवकही सरसावले!
प्रभाग क्रमांक १३ च्या नगरसेविका सुनीता अग्रवाल, आशिष पवित्रकार, प्रभाग क्रमांक ५ च्या नगरसेविका रश्मी अवचार, प्रभाग ८ चे नगरसेवक सुनील क्षीरसागर व तुषार भिरड प्रभागांमध्ये जंतुनाशक फवारणीसाठी सरसावल्याचे दिसून आले.