Akola News: अकोला जिल्ह्यात सोमवारी (२१ जुलै) रात्रीपासून मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील उबारखेड येथील वडील व मुलगा पूर आलेल्या ओढ्यात वाहून गेले. या दुर्घटनेत मुलगा वैभव गवारगुर याचा मृत्यू झाला असून, मृतदेह मंगळवारी (२२ जुलै) सकाळी आढळला. बाळापूर व पातुर तालुक्यातील अनेक मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून, काही मार्गांवरील वाहतूकही काही काळ बंद ठेवावी लागली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
२२ जुलै २०२५ रोजीच्या पर्जन्यमानानुसार:
बाळापूर – ४३.५८ मिमी
पातुर – ४०.६ मिमी
बार्शीटाकळी – १५.९ मिमी
तेल्हारा – ९.९ मिमी
अकोट – ४.७ मिमी
मूर्तिजापूर – ७.५ मिमी
अकोला – ३.० मिमी
जिल्हा सरासरी पाऊस – १५.३ मिमी
अकोला जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेली ठिकाणे
बाळापूर तालुका : बाळापूर (१७७.३ मिमी), पारस (८२.० मिमी)
पातुर तालुका : चान्नी (७५.५ मिमी), सस्ती (७५.५ मिमी)
घरी जात असताना पुरात गेले वाहून
सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास उबारखेड येथील मनोज गवारगुर व त्यांचा मुलगा वैभव मोटारसायकलने शेतातून घरी जात होते. पंचगव्हाण ते निंभोरा बु. दरम्यान नाल्याला पूर आला आला होता. पाण्यातून जात असताना दोघेही वाहून गेले. मंगळवारी सकाळी वैभव गवारगुर याचा मृतदेह मिळून आला आहे.
वाहतूक विस्कळीत
मन प्रकल्पातून विसर्ग आणि अतिवृष्टीमुळे अकोट-देवरी-शेगाव मार्गावरील लोहारा गावाजवळील मन नदीच्या पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे सकाळी ९ वाजल्यापासून रस्ता बंद करण्यात आला होता. उरळ पोलिस स्टेशनने दोन्ही बाजूंनी बॅरिकेडिंग केल्यानंतर, प्रवाह कमी झाल्यामुळे १२.३० वाजता वाहतूक सुरळीत करण्यात आली.