खोलेश्वरमध्ये अज्ञात व्यक्तीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 12:33 IST2020-02-22T12:33:28+5:302020-02-22T12:33:32+5:30

गणेश रामचंद्र काळे(५६) हा व्यक्ती शुक्रवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास मृतावस्थेत पडून असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली.

Akola man killed in Kholeshwar | खोलेश्वरमध्ये अज्ञात व्यक्तीची हत्या

खोलेश्वरमध्ये अज्ञात व्यक्तीची हत्या

अकोला: शहरातील खोलेश्वरमधील लोहिया जिनजवळील एका अपार्टमेंटसमोर एक ५६ वर्षीय व्यक्ती शुक्रवारी सकाळी मृतावस्थेत आढळून आला. जखमी अवस्थेत दिसून आल्याने, या व्यक्तीची हत्या करण्यात आली की आकस्मिक मृत्यू झाला, याबाबत संभ्रम आहे; परंतु कोतवाली पोलीस हत्येच्या दृष्टिकोनातून प्रकरणाचा तपास करीत आहेत.
लोहिया जिनजवळ राहणारा गणेश रामचंद्र काळे(५६) हा व्यक्ती शुक्रवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास मृतावस्थेत पडून असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला. गणेश काळे यांचे दोन्ही गुडघे फुटलेले दिसून आले, तसेच त्यांच्या नाकातून रक्त येत असल्याचे दिसले. त्यामुळे त्याला अज्ञात व्यक्तींनी मारहाण करून त्याची हत्या तर केली नाही, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. गणेश काळे याला दारूचे व्यसन होते. त्याला मुले व पत्नी आहे. त्यामुळे पडून तो जखमी झाला असावा आणि त्यातच मृत्यू झाला असावा, असाही कयास पोलीस व्यक्त करीत आहेत. कोतवाली पोलिसांनी तपास सुरू केला असून, दोन्ही बाजुंनी पोलीस तपास करीत आहेत. त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला होता. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून, शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्याचा मृत्यू कशाने झाला आहे, हे समोर येईल. सध्यातरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Akola man killed in Kholeshwar