अकोला जिल्ह्यात जलसंकटाची चाहूल
By Admin | Updated: August 27, 2014 01:02 IST2014-08-27T01:02:01+5:302014-08-27T01:02:01+5:30
उपाययोजनांसाठी प्रशासनाची लगबग महान धरणातून मिळणारे पाणी थांबविले; ६४ गावांना दगडपारवा धरणातून होणार पाणीपुरवठाm

अकोला जिल्ह्यात जलसंकटाची चाहूल
अकोला : पावसाने दडी मारल्यामुळे भविष्यातील पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. जलसंकटाची चाहूल ऐन पावसाळ्य़ातच लागल्याने पिण्याच्या पाण्यासाठी महान धरणातील जलसाठा संग्रहित ठेऊन प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांसाठी पर्यायी जलस्त्रोतांचा वापर सुरू करण्यात आला आहे. अकोला शहरासाठी पाणीपुरवठय़ाकरिता पर्यायी व्यवस्था म्हणून कापशी तलावातून पाणी उचल करण्यासाठी तातडीने पाऊल उचलण्याचे निर्देश जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत.
महान येथील काटेपूर्णा धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याने खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला महान धरणातून पाणीपुरवठा बंद करून पर्यायी आकस्मिक उपाययोजना म्हणून, ६४ गावांना दगडपारवा धरणातील मृतसाठय़ातून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी दगडपारवा ते खांबोरा येथील उन्नई बंधारादरम्यान नादुरुस्त १00 मीटर जलवाहिनी दुरुस्तीचा प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत सोमवारी जिल्हाधिकार्यांकडे सादर करण्यात आला.
यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र सार्वत्रिक आणि धरणांच्या जलग्रहण क्षेत्रात पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीपातळीत घट होत आहे. अकोला शहर आणि खांबोरा ६४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना महान येथील काटेपूर्णा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो; परंतु धरणात जलसाठय़ात घट होत असल्याने हा जलसाठा अकोला शहराकरिता आरक्षित करण्यात आला आहे. खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी खांबोराजवळील ह्यउन्नई ह्ण बंधार्यात पाणी साठविले जाते. या बंधार्यातील पाणीसाठा संपल्याने, गेल्या बुधवारी खांबोरा पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांना पाणी मिळू शकले नाही. त्यामुळे जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार या योजनेंसाठी गुरुवारी महान येथील काटेपूर्णा धरणातून उन्नई बंधार्यात पाणी सोडण्यात आले होते; परंतु धरणातील जलसाठा अकोला शहरासाठी आरक्षित असल्याने, यापुढे काटेपूर्णा धरणातून खांबोरा पाणीपुरवठा योजनेसाठी पाणी सोडता येणार नाही.
पर्यायी व्यवस्था म्हणून खांबोरा पाणीपुरवठा योजनेला दगडपारवा धरणातील मृतसाठय़ातून पाणीपुरवठा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना २0 ऑगस्ट रोजीच दिला. त्यानुसार दगडपारवा धरणातील मृतसाठय़ातून पाणीपुरवठा करण्याकरिता, तीन वर्षांपूर्वी टाकण्यात आलेल्या १२ किलोमीटर जलवाहिनीपैकी नादुरुस्त झालेल्या १00 मीटर जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामाचा प्रस्ताव सोमवारी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्हाधिकार्यांकडे सादर करण्यात आला. जलवाहिनी दुरुस्तीच्या कामानंतर, खांबोरा योजनेंतर्गत ६४ गावांना दगडपारवा धरणातील मृतसाठय़ातून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
** दगडपारवा धरणात 0.६५ दशलक्ष घनमीटर मृतसाठा!
जोरदार पाऊस झाला नसल्याने, दगडपारवा धरणात अद्यापही उपयुक्त जलसाठा उपलब्ध झाला नाही. धरणाच्या लघुत्तम पातळीखाली जवळपास 0.६५ दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध आहे. महान धरणातील जलसाठय़ात आणखी काही दिवस वाढ न झाल्यास, आपत्कालीन उपाययोजना म्हणून दगडपारवा धरणातील मृतसाठय़ातून खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
** आठवड्यातून एकदा होतो पाणीपुरवठा!
धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याने स्थितीत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनानुसार, खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना सध्या आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यासाठी दरमहा खांबोराजवळील उन्नई बंधार्यातून 0.६३ दशलक्ष घनमीटर पाण्याची उचल केली जोते.
** अकोला शहरासाठी कापशी तलावाचा पर्याय!
अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्या महान येथील काटेपूर्णा धरणात उपलब्ध असलेला अल्प जलसाठा आणि येत्या काही दिवसांत पाऊस न झाल्यास, धरणातील जलसाठय़ात आणखी घट होणार आहे. त्यामुळे भविष्यात शहरात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने, आपत्कालीन पर्यायी उपाययोजना म्हणून कापशी येथील तलावातून शहराला पाणीपुरवठा करण्याची बाब तपासून, त्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही जिल्हाधिकार्यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिले आहेत.
** मूर्तिजापूर शहराला उन्नई बंधार्यातून पाणीपुरवठा!
पाणीटंचाईच्या परिस्थितीत मूर्तिजापूर शहराला खांबोरा जवळील उन्नई बंधार्यातून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी मूर्तिजापूर ते उन्नई बंधार्यापर्यंत जलवाहिनी टाकण्याचे सुरू करण्यात आलेले काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्यांनी नगरपालिका प्रशासनाला दिले आहेत.