अकोला : भाजप जिल्हाध्यक्ष, महानगराध्यक्षांची आज निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 13:58 IST2020-02-12T13:58:02+5:302020-02-12T13:58:07+5:30
जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात पाटील आणि महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे.

अकोला : भाजप जिल्हाध्यक्ष, महानगराध्यक्षांची आज निवड
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : भारतीय जनता पार्टीमध्ये दर तीन वर्षांनी जिल्हा व शहर कार्यकारिणीची फेरनिवड केली जाते. जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात पाटील आणि महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांचा कार्यकाळ संपुष्टात आला असून, बुधवारी भाजपच्या जिल्हाध्यक्ष, महानगराध्यक्षांची निवड होणार आहे.
भाजपच्या जिल्हा कार्यालयात केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, निवडणूक निर्णय अधिकारी आ. गिरीष व्यास यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाध्यक्ष व महानगराध्यक्ष पदासाठी निवड प्रक्रिया पार पडणार असली तरी या दोन्ही पदासाठी पक्षातच मोठी स्पर्धा आहे. महानगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या पदाधिकाऱ्यांकडून गेल्या महिनाभरापासून या पदांसाठी चाचपणी केली जात आहे. या पदासाठी माजी महापौर, माजी स्थायी समिती सभापती यांसह अनेक ज्येष्ठ आजी-माजी नगरसेवक इच्छुक आहेत. तर जिल्हाध्यक्ष पदासाठी आमदार रणधीर सावरकर यांचे नाव कार्यकर्त्यांमध्ये पहिल्या पसंतीचे आहे.
यासोबतच कुणबी समाजाला प्राधान्य देण्याचीही मागणी पक्षातून पुढे येत असल्याची माहिती आहे . भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीची धुरा स्वीकारण्यासाठी पक्षातील अनेक लोकप्रतिनिधी इच्छुक असल्याची माहिती आहे. पक्षातील गटातटाचे राजकारण पाहता जिल्ह्यावर कोणत्या गटाचा वरचष्मा राहतो, यावरच संबंधितांचे राजकीय भवितव्य अवलंबून राहणार असल्याची चर्चा आहे.