काळवीट शिकारप्रकरणी अकोट वनपरिक्षेत्रात चार आरोपींविरुद्ध कारवाई, एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 21:06 IST2025-07-20T21:06:26+5:302025-07-20T21:06:38+5:30
अकोला : प्रादेशिक वन विभागाच्या अकोट वनपरिक्षेत्रातील जऊळखेड येथे काळवीट (ब्लॅक बक) या संरक्षित वन्यप्राण्याची शिकार करून त्याचे मांस ...

काळवीट शिकारप्रकरणी अकोट वनपरिक्षेत्रात चार आरोपींविरुद्ध कारवाई, एकाला अटक
अकोला: प्रादेशिक वन विभागाच्या अकोट वनपरिक्षेत्रातील जऊळखेड येथे काळवीट (ब्लॅक बक) या संरक्षित वन्यप्राण्याची शिकार करून त्याचे मांस विक्री करताना एका आरोपीस रविवारी रंगेहाथ पकडण्यात आले आहे. अन्य तीन आरोपींपैकी मुख्य आरोपी फरार असून, उर्वरित दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वन विभागास २० जुलै २०२५ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, भारतीय वन अधिनियम, १९२७ व वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अंतर्गत कारवाई करण्यात आली. झडती वॉरंटद्वारे मौजा जऊळखेड येथील आरोपींच्या घरांची तपासणी करण्यात आली. यात अंकुश गणेश इंदोरे (रा. जऊळखेड), दिगंबर जनकिराम घारे (रा. कुटासा), गणेश दयाराम इंदोरे (रा. जऊळखेड) या आरोपींचा समावेश आहे.
तपासणीदरम्यान आरोपी क्रमांक २ दिगंबर घारे याच्या राहत्या घरातून काळवीटाच्या मांसाचा साठा सापडला. सुमारे अर्धा किलो मांस जप्त करण्यात आले असून, तो मांस खात असतानाच त्यास रंगेहाथ अटक करण्यात आली. प्राथमिक तपासानुसार, फरार असलेला ईश्वर बाळकृष्ण इंदोरे व आरोपी अंकुश इंदोरे या दोघांनी मिळून कुटासा येथील जंगलात काळवीटाची शिकार केली व त्याचे मांस वाटून घेतले. तिसरा आरोपी गणेश इंदोरे हा अंकुश इंदोरे यांचे वडील असून, तेही मांसाच्या वाटपात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
ही कारवाई उपवनसंरक्षक सुमंत सोळंके व सहाय्यक वनसंरक्षक नम्रता ताले यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) व्ही. आर. थोरात यांच्या नेतृत्वात वनरक्षक पी. ए. तुरुक, अतिक हुसेन, सुभाष काटे, सोपान रेळे, तुषार आवारे आदींनी केली.
जनतेस आवाहन
वन्यप्राण्यांचे पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेता नागरिकांनी वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धन यासाठी पुढाकार घ्यावा. कोणतीही शिकार, छळ किंवा जंगलात आग लावण्याच्या घटना आढळल्यास तत्काळ शासनाच्या टोल फ्री क्रमांक १९२६ वर माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. आपल्या सहकार्यामुळे एका वन्यप्राण्याचा जीव वाचू शकतो.