२७२ गावांना अवकाळीचा ताडाखा; २१ कोटींच्या पीक नुकसानीचा अंतिम अहवाल शासनाकडे!
By रवी दामोदर | Updated: March 23, 2024 16:43 IST2024-03-23T16:43:18+5:302024-03-23T16:43:44+5:30
९ हजार १५२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना बसला होता फटका, शेतकऱ्यांना मदतीची आस.

२७२ गावांना अवकाळीचा ताडाखा; २१ कोटींच्या पीक नुकसानीचा अंतिम अहवाल शासनाकडे!
रवी दामोदर, अकोला : रब्बी हंगामातील पिके ऐन सोंगणीला आली असताना गत महिन्यात दि.२६ फेब्रुवारी रोजी झालेल्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घालीत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. जिल्ह्यातील नुकसानीचा अंतिम अहवाल शुक्रवारी (दि. २२) शासनाकडे पाठविण्यात आला असून, त्यानुसार, जिल्ह्यात २७२ गावांना अवकाळीचा तडाखा बसला आहे. अंतिम सर्वेक्षण अहवालानुसार जिल्ह्यातील ९ हजार १५२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, २१ कोटी १० लाख ३१ हजार ४८२ रुपये मदतीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाला सादर केला आहे.
यंदा खरीप हंगामात उत्पादनात प्रचंड घट झाल्याने शेतकऱ्यांची मदार रब्बी हंगामावर होती. पैशांची जुळवाजुळव करून शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात पेरणी केली. पीक ऐन काढणीच्या अवस्थेत असताना दि. २६ फेब्रुवारीला मध्यरात्री जिल्ह्यात वादळ वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामध्ये अकोला, बार्शीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर तालुक्यात किरकोळ प्रमाणात गारपीटही झाली. अवकाळी पावसामुळे कांदा, गहू, हरभरा, ज्वारी, संत्रा, आदींसह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त भागात जिल्हा प्रशासनाच्यावतीने कृषी, ग्रामविकास व महसूल विभागाकडून पंचनामे करून सर्व्हे करण्यात आला आहे. त्यानुसार, जिल्ह्यात तब्बल ९ हजार १५२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसल्याचे चित्र आहे.
पीक नुकसान व आवश्यक निधी -
क्षेत्राचा प्रकार - गावे - शेतकरी - बाधित क्षेत्र - अपेक्षित निधी
जिरायत पिके - ६७ - ३५८४ - २७५५ - ३७४६९६३२
बागायत पिके - १८३ - ८१०३ - ६३०३ - १७०१९४५०
फळ पिकं - २२ - १२० - ९३.६५ - ३३७१४००
एकूण - २७२ - ११८०७ - ९१५२.१२ - २११०३१४८२
गहू, हरभऱ्याचे सर्वाधिक नुकसान -
फेब्रुवारीच्या अंतिम आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे गहू व हरभरा पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. जिरायती व बागायती क्षेत्र मिळून तब्ब्ल ४ हजार ५०७ हेक्टर क्षेत्रावरील गव्हाला फटका बसला आहे, तर ३ हजार २४२ हेक्टर क्षेत्रावरील हरभरा पिकाचे नुकसान झाले आहे. नुकसानीचा अंतिम अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला असून, शेतकऱ्यांना मदतीचा आस आहे.