अमरावती विभागातील प्रकल्पांमध्ये ५५.१४ टक्के पाणीसाठा शिल्लक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 19:21 IST2021-04-10T19:21:22+5:302021-04-10T19:21:27+5:30
Irrigatin Projects : सद्य:स्थितीत ५५.१४ टक्के म्हणजेच ३१९३.७८ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.

अमरावती विभागातील प्रकल्पांमध्ये ५५.१४ टक्के पाणीसाठा शिल्लक!
अकोला : अमरावती विभागातील मोठ्या, मध्यम प्रकल्पांसह लघु प्रकल्पामध्ये सद्य:स्थितीत ५५.१४ टक्के म्हणजेच ३१९३.७८ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच तारखेला ४७.६१ टक्के पाणीसाठा होता. २०२० पेक्षा यंदा ७.५३ टक्के पाणीसाठा अधिक आहे. त्यामुळे यावर्षी पाणीटंचाईची शक्यता कमीच आहे
अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशिम या जिल्ह्यामध्ये एकूण मोठे, मध्यम व लघु असे ४४६ प्रकल्प आहेत. मोठ्या प्रकल्पांमध्ये अमरावतीमधील उर्ध्व वर्धा, यवतमाळमधील पुस प्रकल्प, अरूणावली, बेंबळा, अकोलामधील काटेपूर्णा, वाण प्रकल्प तर बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा, पेनटाकळी आणि खडकपूर्णा अशा १० प्रकल्पांचा समावेश आहे. यावर्षी पावसाळा चांगला झाला. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली. उन्हाळा सुरू असल्याने पाण्याचा वापर वाढला आहे. पावसाळ्याला आणखी पुढील दोन महिने बाकी आहे. सद्य:स्थितीत अमरावती विभागातील प्रकल्पांमध्ये ५५.१४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मोठ्या प्रकल्पांवर हजारो हेक्टर शेतीला सिंचनासाठी सुध्दा पाण्याचा उपयोग केला जाते. मागील वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे या प्रकल्पांमध्ये उन्हाळ्यातही पाण्याची पातळी टिकून आहे.