महाडीबीटी पोर्टलमार्फत ४,५४७ शेतकऱ्यांची निवड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 11:12 AM2021-06-07T11:12:24+5:302021-06-07T11:14:27+5:30

Government Scheme For Farmer : ट्रॅक्‍टर व इतर कृषी अवजारे, ठिबक, तुषार संच व इतर सिंचन सुविधांच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांकडून महाडीबीटी पोर्टलद्वारे अर्ज करण्यात आले होते.

4,547 farmers selected through MahaDBT portal! | महाडीबीटी पोर्टलमार्फत ४,५४७ शेतकऱ्यांची निवड!

महाडीबीटी पोर्टलमार्फत ४,५४७ शेतकऱ्यांची निवड!

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करणे सुरू एकाच ठिकाणी अनेक योजनांचा लाभ

अकोला : कृषी विभागामार्फत यावर्षी प्रथमच शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी पोर्टलमार्फत योजना राबविण्यात आली. या योजनेंतर्गत एकाच ठिकाणी अनेक योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. ट्रॅक्‍टर व इतर कृषी अवजारे, ठिबक, तुषार संच व इतर सिंचन सुविधांच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांकडून महाडीबीटी पोर्टलद्वारे अर्ज करण्यात आले होते. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ४ हजार ५४७ शेतकऱ्यांची निवड झाली आहे. या निवड झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करणे सुरू झाले आहे.

महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून शेतकऱ्यांनी शेती निगडित विविध बाबींकरिता अर्ज केले होते. यामध्ये यांत्रिकीकरण १३ हजार ५९९, सिंचन सुविधा १० हजार १८४ व फलोत्पादनासाठी ७ हजार २०७ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. तर सर्व योजनेत ४ हजार ५४७ शेतकऱ्यांची निवड झाली आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करणे सुरू झाले असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. सर्व प्रक्रिया ऑनलाइन व सुलभरित्या झाली आहे. अनेक योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळत असल्याने सोयीस्कर झाले आहे.

 

निवड झालेले अर्ज

यांत्रिकीकरण

८१८

सिंचन सुविधा

३,६०७

फलोत्पादन

१२२

 

अशी झाली प्रक्रिया

पोर्टलवरील प्राप्त अर्जांची ऑनलाइन लॉटरीपूर्व संमती देणे, प्रक्रिया तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थींच्या खात्यावर थेट महाडीबीटीद्वारे अनुदान वितरित करणे आदी सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होत आहे.

सर्वाधिक अर्ज यांत्रिक शेतीसाठी

महाडीबीटी पोर्टलवरून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे. शेतकरी कोणत्याही वेळी, कुठूनही आपले सरकार महाडीबीटीच्या पोटर्लवरून नोंदी करून राज्य आणि केंद्र पुरस्कृत कृषी योजनेसाठी अर्ज करू शकतात. जिल्ह्यातून यांत्रिकीकरण, सिंचन, फलोत्पादनाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये यांत्रिक शेतीसाठी सर्वाधिक १३ हजार ५९९ अर्ज आले आहेत.

Web Title: 4,547 farmers selected through MahaDBT portal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.