तुरीची सोंगणी १२०० रुपये एक्कर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:47 IST2021-01-13T04:47:04+5:302021-01-13T04:47:04+5:30
बाळापूर : खरीप हंगामात तालुक्यात तुरीचा पेरा मोठ्या प्रमाणात आहे. सध्या तुरीची सोंगणी सुरू झाली असल्याने शेतकरी कामात व्यस्त ...

तुरीची सोंगणी १२०० रुपये एक्कर !
बाळापूर : खरीप हंगामात तालुक्यात तुरीचा पेरा मोठ्या प्रमाणात आहे. सध्या तुरीची सोंगणी सुरू झाली असल्याने शेतकरी कामात व्यस्त आहे. गतवर्षीपेक्षा सोंगणीचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात तुरीच्या सोंगणीचा दर प्रति एक्कर १२०० रुपये असल्याने शेतकऱ्यांचा लागवडी खर्चही निघणे कठीण झाले आहे.
यंदा सततचा पाऊस व परतीच्या पावसानेे खरीप हंगामातील सर्वच पिकांची नासाडी झाली. तसेच कपाशीच्या वेचणीच्या सुरुवातीलाच बोंडअळीने आक्रमण केल्याने उत्पादनात प्रचंड घट झाल्याने खर्चही वसूल झाला नाही. सध्या खरीप हंगामातील शेवटचे पीक असलेले तुरीची सोंगणी सुरू झाली आहे. तूर सोंगणीचा दर वाढल्याने शेतकऱ्यांना खर्च न परवडणारा झाला आहे. तर दुसरीकडे, महागाई महागल्याने हातावर पोट असणाऱ्या मजुरांनाही दर वाढविल्याशिवाय पर्याय नसल्याचे मजुरांनी सांगितले. (फोटो)
----------------------------
ढगाळ वातावरणामुळे सोंगणीची लगबग
गत आठवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी धास्तावले आहेत. गत दोन ते तीन दिवसांपासून पुन्हा ढगाळ वातावरण असल्यामुळे शेतकऱ्यांनी तुरीची सोंगणी सुरू केली असून, घाई करीत असल्याचे चित्र आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान होऊ नये यासाठी शेतकरी सोंगणी करीत असल्याचे दिसून येत आहे.
-------------------------------
महागाई वाढल्याने मजुरी न परवडणारी झाली आहे. हाताला दुसरे काम नसल्याने पोट भरण्यासाठी शेतात काम करावे लागते. त्यामुळे मजुरी वाढविणे नाईलाज आहे. सरकारने किसान सन्मान योजनेसारखी मजुरांसाठी योजना अंमलात आणून मजुरांना दिलासा द्यावा.
- शेतमजूर
------------------------------
ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या सोंगणीची लगबग सुरू आहे. सध्या सोंगणीचा दर प्रति एक्कर १२०० रुपये असल्याने व उत्पादनात घट येत असल्याने खर्चही वसूल होणे कठीण आहे.
- शेतकरी
--------------------
गतवर्षीचा दर- ८००-९००
यंदाचा दर- १०००-१२००