अकोल्यात चलनातून बाद झालेल्या १० लाखांच्या नोटा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 13:30 IST2018-03-01T13:30:22+5:302018-03-01T13:30:22+5:30
अकोला - भारत सरकारने नोव्हेंबर २०१६ मध्ये एक हजार व ५०० रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्यानंतरही मोठया प्रमाणात या नोटा काही बडया उद्योजक व व्यापाऱ्यांकडे असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.

अकोल्यात चलनातून बाद झालेल्या १० लाखांच्या नोटा जप्त
- सचिन राऊत
अकोला - भारत सरकारने नोव्हेंबर २०१६ मध्ये एक हजार व ५०० रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्यानंतरही मोठया प्रमाणात या नोटा काही बडया उद्योजक व व्यापाऱ्यांकडे असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. तब्बल १० लाख रुपयांच्या एक हजार रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या नोटा घेउन जात असलेल्या चार युवकांना शहर पोलिस उपअधिक्षक उमेश माने पाटील यांच्या पथकाने गुरुवारी महाकाली हॉटेलसमोर अटक केली.
महाकाली हॉटेलसमोर शिवणी येथील रहिवासी सतीष महादेव तायडे हा एका दुचाकीमध्ये चलनातून बाद झालेल्या एक हजार रुपयांच्या १० लाख रुपयांच्या नोटा घेउन असल्याची माहिती शहर पोलिस उपअधिक्षक उमेश माने पाटील यांना मिळाली. त्यांनी पथकाला या परिसरात कार्यरत करून पाळत ठेवण्याचे सांगीतले. यावरुन पथकाने या परिसरात पाळत ठेउन संशयास्पद हालचाल करीत असलेल्या सतीष तायडे याला ताब्यात घेतले. त्याची दुचाकी जप्त करून झडती घेतली असता यामध्ये एक हजार रुपयांच्या एक हजार नोटा म्हणजेच तब्बल १० लाख रुपये जप्त केले. यावेळी सतीष तायडे याचे साथीदार आशीष पांडे, आलोक जोशी, पार्थ लोंडे यांनाही ताब्यात घेण्यात आले. या चारही आरोपींविरुध्द खदान पोलिस ठाण्यात स्पेसीफाइड बँक नोट सेशन आॅफ लायबिलीटी कायद्याच्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलिस उपअधिक्षक उमेश माने पाटील, परिविक्षाधील शहर पोलिस उपअधिक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनात राजु वाकोडे, विनय जाधव व संतोष गवई यांनी केली.
आयकर व आरबीआयला माहिती
शहर पोलिस उपअधिक्षक उमेश माने पाटील यांच्या पथकाने १० लाख रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या नोटा जप्त केल्या. त्यानंतर या प्रकरणाची माहिती आयकर व आरबीआयच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यांच्याकडून या प्रकरणाची पुढील चौकशी करण्यात येणार आहे. या कारवाईमूळे अद्यापही मोठया प्रमणात चलनातून बाद झालेलया नोटा अकोल्यात असल्याचे वास्तव आहे.