वडझरी शिवारात युवकाचा निर्घृण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 04:28 PM2019-05-03T16:28:01+5:302019-05-03T16:28:40+5:30

संगमनेर तालुक्यातील वडझरी खुर्द शिवारात अज्ञात व्यक्तींनी बेदम मारहाण करीत डोक्यात दगड घालून अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयाच्या युवकाचा निर्घृण खून केला.

The youth's murderous blood in Wadjari Shivar | वडझरी शिवारात युवकाचा निर्घृण खून

वडझरी शिवारात युवकाचा निर्घृण खून

Next

तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील वडझरी खुर्द शिवारात अज्ञात व्यक्तींनी बेदम मारहाण करीत डोक्यात दगड घालून अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयाच्या युवकाचा निर्घृण खून केला. आरोपींनी मृतदेह फरपटत ओढत नेऊन दगड खाणीत फेकला व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. बुधवारी (दि. १) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. खून झालेल्या युवकाची ओळख पटू शकली नाही. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
वडझरी खुर्द शिवारात किसन काळू थोरात नामक शेतकऱ्याच्या शेतात दगडखाण आहे. दगडखाणीच्या पाहणीसाठी रामदास बाळासाहेब नवले हे बुधवारी दुपारी गेले होते. त्यांना दगडखाणीत कुजलेल्या व दुर्गंधी सुटलेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह आढळून आला. त्यांनी पोलीस पाटील नानासाहेब सुपेकर यांना घटनेची माहिती दिली. सुपेकर यांनी खातरजमा करून करून पोलिसांना खबर दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस निरीक्षक सुनील पाटील, सहायक फौजदार दत्तात्रय पानसरे, हे. कॉ. लक्ष्मण औटी, पोलीस नाईक बाबा खेडकर, पो. ना. लुमा भांगरे यांनी तातडीने घटनास्थळी येऊन माहिती घेत मृतदेहाचा पंचनामा केला. घटनास्थळादरम्यान ठिकठिकाणी रक्त सांडलेले होते. मृतदेहाचा चेहरा शर्टने बांधलेल्या स्थितीत होता. मृतदेहानजीक पोलिसांना चपला तसेच दुचाकीची चावी सापडली. त्या युवकाच्या डोक्यात दगड घालून व कानाच्यावर डोक्यात टणक हत्याराने मारहाण करून हा खून केला. किमान तीन दिवसापूर्वी हा खून केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
खून झालेल्या युवकाचे वर्णन असे : उंची पाच फूट ५ इंच, शरीराने मजबूत, डोक्यास काळे - पांढरे केस, अंगात निळा आकाशी रंगाचा रेघा असलेला शर्ट व निळसर पांढरी जीन्स, कंबरेला साधा बेल्ट, पायात साधी ब्राऊन रंगाची चप्पल, ओठाच्या खाली छोटी दाढी व मिशी, उजव्या हाताच्या अंगठ्याला सहावे बोट, उजव्या हातात काळ्या मन्याचे ब्रेसलेट. चंदनापुरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. देशमुख यांनी जागेवरच मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली. त्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणीच कुजलेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. नानासाहेब लक्ष्मण सुपेकर यांनी फिर्याद दिली.

Web Title: The youth's murderous blood in Wadjari Shivar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.