फिर्याद मागे घेण्यासाठी महिलेला विवस्त्र करून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 04:10 IST2020-03-03T04:10:48+5:302020-03-03T04:10:52+5:30
अत्याचाराची फिर्याद मागे घेण्यासाठी पीडित महिलेसह तिच्या पतीला नग्न करुन मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.

फिर्याद मागे घेण्यासाठी महिलेला विवस्त्र करून मारहाण
अहमदनगर : अत्याचाराची फिर्याद मागे घेण्यासाठी पीडित महिलेसह तिच्या पतीला नग्न करुन मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. हा व्हीडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. नातेवाईकांसह पोलीस अधिकाऱ्यानेही अत्याचार केल्याची या महिलेची तक्रार आहे.
पाथर्डी तालुक्यातील या महिलेच्या पतीने विरोधात निवडणूक लढवली म्हणून त्याला त्रास देऊन त्याच्या विरोधात पाथर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात तिच्या पतीला अटक झाली. या महिलेने पतीला सोडविण्यासाठी अनेकांकडे मदत मागितली. त्यावेळी पोलिसासह, नातेवाईकांनी अत्याचार केल्याचा महिलेचा आरोप आहे. २०१६ मध्ये सदर महिलेले तोफखाना पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरुन सहा जणांविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल झालेला आहे. याच गुन्ह्यातील फिर्याद मागे घेण्यासाठी तिला व पतीला विवस्त्र करुन मारहाण करण्यात आली, असा आरोप आहे.
पीडित महिला २४ जानेवारीला आपल्या पतीच्या उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आली होती. रुग्णालयातून पतीसह बाहेर पडल्यानंतर घरी जाण्यासाठी हे पती-पत्नी रिक्षात बसले. रिक्षात अगोदरच एक इसम होता. त्याने गुंगीचे औषध देऊन आपणासह पतीला अज्ञात स्थळी नेले. तेथे नग्न करुन मारहाण करण्यात आली. अंगावर पेट्रोल टाकण्यात आले, असा दावा या महिलेने माध्यमांशी बोलताना केला आहे. महिलेचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर या घटनेची दखल घेत पोलिसांनी महिलेची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.
>अत्याचार पीडित महिलेचा जबाब नोंदविण्यात येत असून याप्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
- संदीप मिटके, पोलीस उपअधीक्षक
>पीडित महिला मदतीसाठी स्रेहालयच्या न्यायाधार प्रकल्पाकडे आली होती. पतीला जाणीवपूर्वक अटक करण्यात आली व त्यानंतर आपला छळ करण्यात आला, अशी तक्रार तिने केली होती. आम्हीही या घटनेचा तपास करत होतो. कालांतराने ही महिला संस्थेतून बाहेर पडली व पुन्हा आली नाही.
- शाम असावा, स्रेहालय कार्यकर्ते