‘साकळाई’ चे स्वप्न सत्यात उतरेल का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 11:52 AM2019-02-13T11:52:04+5:302019-02-13T11:52:19+5:30

नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना वरदान ठरणारी साकळाई उपसा जलसिंचन योजनेस कधी नव्हे तो एवढा जनरेटा मिळाला आहे.

Will the dream of 'Sankali' come true? | ‘साकळाई’ चे स्वप्न सत्यात उतरेल का ?

‘साकळाई’ चे स्वप्न सत्यात उतरेल का ?

Next

योगेश गुंड,

अहमदनगर : नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना वरदान ठरणारी साकळाई उपसा जलसिंचन योजनेस कधी नव्हे तो एवढा जनरेटा मिळाला आहे. प्रत्येक वेळी निवडणूक आली कि सर्वांनाच साकळाई योजनेची आठवण होते. निवडणूक संपली कि साकळाई योजना पुन्हा विजनवासात निघून जाते. हा गेल्या २० वर्षांचा सर्वसामान्य शेतक-यांचा अनुभव आहे. यावेळीही नेमक्या निवडणुकीच्या तोंडावर साकळाई योजना गाजू लागली आहे. आता तर थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात हा विषय गेल्याने साकळाई चे स्वप्न आता तरी सत्यात उतरेल का हाच प्रश्न ३५ गावातील शेतक-यांना पडला आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील १८ गावे आणि नगर तालुक्यातील हिवरे झरे, घोसपुरी, सारोळा कासार, खडकी, बाबुर्डी बेंद, वाळकी, दहिगाव, साकत, वाटेफळ, रुई, गुंडेगाव, वडगाव, तांदळी, देऊळगाव, गुणवडी, राळेगण म्हसोबा, आंबीलवाडी आदी १७ गावांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
१९९८ पासून साकळाई योजनेचा विषय चर्चेत आला आहे. तेव्हा युती सरकारच्या काळात या योजनेला तात्विक मंजुरी मिळाली. त्यानंतर मात्र या योजनेचा फक्त राजकीय भांडवल करण्यासाठीच वापर करण्यात आला. अनेकांनी याच योजनेच्या मुद्द्यावर विधानसभा निवडणुका लढवल्या. फक्त निवडणुका पुरता साकळाई चा विषय चर्चेत आल्याने या योजनेला प्रशासकीय पातळीवर मंजुरी मिळाली नाही. यामुळे २० वर्षांपासून या योजनेचे फक्त गाजरच दाखवण्यात येत आहे.

काही महिन्यापूर्वी राजकारण विरहीत समिती तयार करून पुन्हा या योजनेबाबत जनजागृती करण्यात आली. त्यास सर्वसामान्य लोकांचा पाठिंबा मिळाला. यामुळेच रुई छत्तीशी येथे मोठे जन आंदोलन उभे राहिले. यात आजी माजी आमदार, आजी माजी खासदार तसेच निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत असणारे मातब्बर नेते सहभागी झाले होते. मंगळवारी डॉ.सुजय विखे यांनी याच साकळाई च्या प्रश्नाबात मुख्यमंत्री यांच्याशी बैठक आयोजीत केली. नेमक्या याच दिवशी माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार शिवाजी कर्डिले यांनी मुख्यमंत्र्यांना साकळाई चे निवदेन दिले. विखे व पाचपुते यांना मुख्यमंत्र्यांनी या योजनेचा सर्व्हे करण्यात येणार असल्याचे सांगून त्याचे अंदाजपत्रक तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले. नगर तालुक्यात चर्चिली जाणारी योजना २० वर्षानंतर मंत्रालयात चर्चिली गेली. यामुळे योजनेबाबत आशावाद निर्माण झाला आहे.

श्रीगोंदा आणि नगर तालुक्यातील जी गावे या योजनेच्या कक्षेत येतात ती कायमस्वरूपी दुष्काळी गावे आहेत. हि योजना पूर्ण झाली तर या दुष्काळी गावांचा चेहरामोहरा बदलेल. या योजनेमुळे जवळपास १२० पाझर तलाव, आणि १०० कोल्हापुरी बंधारे भरले जातील त्यामुळे १८ हजार ५०० हेक्टर क्षेत्र बागायती होणार आहे. यासाठी जवळपास ८०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. सध्यातरी स्वप्न वत वाटणारी हि योजना सत्यात कधी येणार हाच प्रश्न या योजनेत येणा-या गावातील शेतक-यांना पडला आहे. श्रेय कोणी पण घ्या पण योजना मार्गी लावा अशीच मागणी येथील शेतक-यांची आहे.

काय आहे साकळाई योजना
कुकडी प्रकल्पाचे पावसाळ्यात वाया जाणारे अतिरिक्त पाणी विसापूर धरणातून बंद पाईपने उचलून ११ किलोमीटर लांब असलेल्या साकळाई डोंगरावर नेण्यात येणार आहे. दोन मोठे डीलीव्हरी चेंबर उभारून त्यामधून पुन्हा बंद पाईपलाईनमधून नैसर्गिक उताराने हे पाणी नगर तालुक्याच्या बाजूला ११ किलोमीटरच्या अंतरावरील सुमारे १७ गावांना आणि श्रीगोंदा तालुक्यातील १८ गावांना पोहचविले जाणार आहे.

Web Title: Will the dream of 'Sankali' come true?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.