‘त्या’ नऊ मजुरांना निवारा देता का निवारा ?; पोलिसांची नगर महापालिकेकडे याचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 08:48 PM2020-04-27T20:48:44+5:302020-04-27T20:49:23+5:30

ठाण्याहून वाशिमला परतणाऱ्या नऊ मजुरांना पोलिसांनी नगर शहरात रोखले खरे, पण त्यांच्या निवा-याची व्यवस्थाच होत नसल्याने हे मजूर चक्क पोलीस स्टेशनमध्येच बसून आहेत. रविवारची रात्र त्यांनी चक्क पोलीस व्हॅनमध्ये काढली.

Why shelter ‘those’ nine laborers ?; Police plead to Municipal Corporation | ‘त्या’ नऊ मजुरांना निवारा देता का निवारा ?; पोलिसांची नगर महापालिकेकडे याचना

‘त्या’ नऊ मजुरांना निवारा देता का निवारा ?; पोलिसांची नगर महापालिकेकडे याचना

Next

अहमदनगर: ठाण्याहून वाशिमला परतणाऱ्या नऊ मजुरांना पोलिसांनी नगर शहरात रोखले खरे, पण त्यांच्या निवा-याची व्यवस्थाच होत नसल्याने हे मजूर चक्क पोलीस स्टेशनमध्येच बसून आहेत. रविवारची रात्र त्यांनी चक्क पोलीस व्हॅनमध्ये काढली.
वाशिमचे हे मजूर ठाण्याहून गावाकडे पायी निघाले होते. त्यामध्ये पाच पुरुष व चार महिला आहेत. रविवारी नगर शहरात सकाळी सात वाजता त्यांना पोलिसांनी अडविले. त्यानंतर त्यांना तोफखाना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांनी मजुरांची जिल्हा रुग्णालयात नेऊन तपासणी केली. रुग्णालयाने त्यांच्या हातावर क्वारंटाईनचे शिक्के मारले असून त्यांना नगर शहरातच क्वारंटाईन करण्यास सांगितले आहे.
त्यामुळे तोफखाना पोलीस मजुरांना घेऊन महापालिकेत गेले. मात्र महापालिका त्यांची व्यवस्था करायला तयार नाही. त्यामुळे हे मजूर रविवारी दिवसभर व रात्रभर पोलीस स्टेशनला बसून होते. बराच काळ त्यांनी पोलीस व्हॅनमध्येच काढला. सोमवारीही तोफखाना पोलीस महापालिका आयुक्तांकडे गेले. मात्र, आम्ही या मजुरांची सोय करु शकत नाही. या मजुरांना तुम्ही जेथे ताब्यात घेतले तेथे सोडून द्या, असे उत्तर महापालिका आयुक्तांनी दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
मजुरांची ते सापडतील तेथे सोय करा अशी मुख्यमंत्र्यांची सूचना आहे. त्यासाठी सरकारने प्रत्येक जिल्ह्याला निधी दिला आहे. नगर महापालिकेचे अधिकारी मात्र नऊ मजुरांची सोय करायला तयार नाहीत. रविवारी सकाळी ताब्यात घेतलेल्या या मजुरांना नगर महापालिका सोमवारी रात्रीपर्यंत निवारा देऊ शकलेली नाही.

आत्तापर्यंत नगर महापालिकेने चारशे मजुरांची व्यवस्था केली आहे. मात्र, अजूनही मजूर येत आहेत. त्यामुळे व्यवस्था करायची कोठे ? हा प्रश्न आहे. आम्हाला जिल्हा पुरवठा विभागाकडून साधे धान्यही मिळालेले नाही. आहे त्या मजुरांना सांभाळण्याची लाखो रुपयांची बिले संस्थांनी आमच्याकडे पाठवली आहेत. हे पैसे द्यायचे कसे? हा प्रश्न आहे.
- श्रीकांत मायकलवार, आयुक्त महापालिका, अहमदनगर

लॉकडाऊन तोडून शहरातून जात असताना नऊ मजूर पोलिसांच्या निदर्शनास आल्याने त्यांना ताब्यात घेतले. या मजुरांची जिल्हा रुग्णालयात तपासणी करून घेण्यात आली असून त्यांना क्वारंटाईन करण्यास सांगितले आहे. त्यामुळे या मजुरांना निवारा कक्षात तत्काळ दाखल करणे गरजेचे आहे. या संदर्भात गेल्या दोन दिवसांपासून महापालिका प्रशासनाशी वारंवार संपर्क करूनही या मजुरांना दाखल करून घेतले जात नाही. आता या मजुरांना ठेवायचे कुठे, हा प्रश्न आमच्यासमोर आहे.
-हारुण मुलाणी, पोलीस निरीक्षक, तोफखाना पोलीस स्टेशन

Web Title: Why shelter ‘those’ nine laborers ?; Police plead to Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.