Vikhe should not challenge us - Ram Shinde; The defeat report will make everything clear | विखेंनी आम्हाला चॅलेंज देऊ नये-राम शिंदे; पराभवाच्या अहवालात सर्व काही स्पष्ट होईल

विखेंनी आम्हाला चॅलेंज देऊ नये-राम शिंदे; पराभवाच्या अहवालात सर्व काही स्पष्ट होईल

अहमदनगर : भाजप संघटनात्मक पातळीवर कमी पडलेला आहे. पराभवाचे कारणे शोधणारा चौकशी अहवाल वरिष्ठांना सादर होईल, त्यामध्ये सर्व काही स्पष्ट होईल. माझे वडील काही खासदार, आमदार, मुख्यमंत्री नव्हते. त्यामुळे मला चॅलेंज करायचा प्रश्नच नाही. पक्ष हा काही कोणाची बापजादाची इस्टेट नाही. जनाधारामुळे सर्व पदे मी भोगली. पक्षाने मला न्याय दिला. केवळ हे फक्त भाजपमध्येच घडू शकते, असे सांगून माजीमंत्री प्रा.राम शिंदे यांनी खासदार डॉ.सुजय विखे यांना टोला लगावला.
भाजप उमेदवाराच्या पराभवाला जबाबदार असल्याचे एक तरी उदाहरण सांगा, असे आवाहन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले होते. याबाबत विचारलेल्या प्रश्नावर प्रा शिंदे यांनी थेट हल्लाबोल केला. सावेडी येथील संपर्क कार्यालयात रविवारी शिंदे बोलत होते. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड, शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे उपस्थित होते. प्रा. शिंदे म्हणाले,  भाजपने विशेष बैठक बोलावून एकत्र ऐकून घेतले होते. याचा अर्थ कोणताही समेट झालेला नाही. पक्षाच्या वरिष्ठांकडे अहवाल आल्यानंतर त्यामध्ये पराभवाची कारणे स्पष्ट होतील. जिल्हा विभाजनासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. सरकारमध्ये असताना बाजू मांडली. मात्र नगर जिल्ह्यासह सहा ते सात जिल्ह्यांचे जिल्हा विभाजनाचे प्रस्ताव होते. त्याचा खर्च मोठा होता. निवडणूक तोंडावर होती. एका जिल्ह्याचे विभाजन झाले असते तर दुसºया जिल्ह्यात नाराजी झाली असती. त्यामुळे विभाजन झाले नाही. आता जिल्ह्यात तीन मंत्री आहेत, त्यामुळे जिल्हा विभाजनाचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो. उत्तरेचे मुख्यालय काय असावे, हे सरकार ठरवेल. आधी खात्यावरून, नंतर बंगले, दालने यावरून सरकारचा तब्बल ५२ दिवस गोंधळ सुरू होता. यामध्ये जिल्ह्याला उशिरा पालकमंत्री मिळाले. अन्य जिल्ह्यात पालकमंत्र्यांनी आढावा बैठका घेतला. नगरला यायला पालकमंत्र्यांना उशिरा मुहुर्त मिळाला. नगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीच्या कोट्यात असल्याने ते आपल्याला मिळणार नाही, याची जाणीव असल्यानेच बाळासाहेब थोरात यांनी आधीपासूनच पालकमंत्रीपद घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्यांनी मिळालेले कोल्हापूरचे पालकमंत्रीपदही नाकारले.

Web Title: Vikhe should not challenge us - Ram Shinde; The defeat report will make everything clear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.