Travel in three countries in Europe for peace of mind | मन:शांतिसाठी युरोपातील तीन देशातील भाविक साईचरणी
मन:शांतिसाठी युरोपातील तीन देशातील भाविक साईचरणी

प्रमोद आहेर ।  शिर्डी : युरोपात सुबत्ता असली तरी कॅन्सरपेक्षाही भयानक असलेली मानसिक अस्थिरता व परमेश्वरापासून दूर जाणा-यांची संख्याही वाढते आहे़. या पार्श्वभूमीवर तेथून मन:शांतिसाठी शिर्डीला येणारांचे प्रमाण वाढत असल्याचे मत युरोपातील श्रीसाई कालेश्वर ट्रस्टच्या अध्यक्षा तातियाना रेन्पल यांनी व्यक्त केले़. रेन्पल म्हणाल्या, साईबाबांची मानवतेची, सर्वधर्म समभावाची शिकवण ही आम्हाला इथे आकर्षित करते. आमच्या ट्रस्टशी युरोपातील चौदा देशांचे हजारो नागरिक जोडले गेले आहेत़. अशांततेच्या उंबरठ्यावर असलेल्या जगाला साईबाबांचे विचारच वाचवू शकतील. युरोपात भक्तीची वाणवा असल्याने शक्तीचा -हास होतो़. साईबाबांच्या भक्तीने आपोआप शक्ती मिळते, असे रेन्पल यांनी सांगितले. वीस वर्षापूर्वी तातियाना जेव्हा प्रथमच भारत भ्रमण करण्यासाठी आली. तेव्हा शिर्डीच्या साईबाबांविषयी माहिती मिळाली. साईबाबांच्या विचाराचा व शिकवणुकीचा प्रचार-प्रसार करण्यासाठी ट्रस्टच्या माध्यमातून भजनसंध्या, ध्यान, साई आरती, अभिषेक तसेच दर रविवारी एक हजार गरिबांना अन्नदान करण्यात येते. दरवर्षी भारतातील धार्मिक, ऐतिहासिक स्थळांची सहल काढण्यात येते. त्यात शिर्डीचा हमखास समावेश असतोच. दरवेळी वेगवेगळे भाविक असतात. मंगळवारी (दि़०५) तातियाना जवळपास वीस विदेशी भाविकांना घेऊन तातियाना साईनगरीत आली आहे. यात जर्मनी, रशिया व झेक प्रजासत्ताक येथील नागरिकांचा समावेश आहे. या विदेशी भाविकांचा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी सत्कार केला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, जनसंपर्क अधिकारी मोहन यादव, अनिल भणगे, सुनील तांबे आदी उपस्थित होते. ट्रस्टला युरोपमध्ये असलेल्या जर्मनीतील फ्रॅन्कफर्ट शहरात मोठे साईमंदिर उभारायचे आहे. त्यासाठी स्थानिक प्रशासन व मेयरशी चर्चाही झाली आहे. देणगीतून हे मंदिर उभारण्यात येणार आहे.

Web Title: Travel in three countries in Europe for peace of mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.