A shocking incident took place on the eve of polling in Adarsh Gaon Ralegan Siddhi | आदर्श गाव राळेगणसिद्धीत मतदानाच्या पूर्वसंध्येला घडला धक्कादायक प्रकार

आदर्श गाव राळेगणसिद्धीत मतदानाच्या पूर्वसंध्येला घडला धक्कादायक प्रकार

अहमदनगर : राज्यातील १४ हजारहून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी गेला पंधरवडाभर धुरळा उडाला होता. दरम्यान, प्रचार समाप्त होऊन आता उद्या या ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे गाव असलेल्या राळेगणसिद्धीमध्येही यावेळी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध न होता मतदान होत आहे. मात्र या मतदानाच्या पूर्वसंध्येला आदर्श गाव असलेल्या राळेगणसिद्धीच्या प्रतिष्ठेला धक्का लावणारा प्रकार गावात घडला आहे.

आदर्श गाव असलेल्या राळेगणसिद्धी येथे ग्रामपंचायत निवडणुकीत आचारसंहिता भंग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येला मतदारांना साड्या वाटप करताना भरारी पथकाने दोघांना पकडले आहे. या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, गावोगावच्या निवडणुकीत दोन किंवा त्यापेक्षा अधिक पॅनल करून निवडणूक लढविली जात असतानाच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी गावात चक्क एकच पॅनल यंदाच्या निवडणुकीला सामोरे जात आहे. राळेगणसिद्धीच्या इतिहासात प्रथमच दोन्ही विरोधकांनी एकत्र येऊन एकच पॅनल उभा केला आहे. तर या पॅनलविरोधात अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरतले आहेत. या उमेदवारांनीही साध्या पद्धतीने प्रचार करीत टीका टाळत विकासाच्या मुद्यांवर भर दिला आहे.
राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथे गावपातळीवरील निवडणुकीत एकमेकांचे विरोधक असलेले लाभेश औटी व जयसिंग मापारी यांनी यावर्षी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले. ते दोघेही एकत्र आले. मात्र, काही लोकांना निवडणुकीसाठी उभे रहायचे असल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरले. ९ पैकी सात जागांवर अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरले तर औटी-मापारी यांच्या राळेगणसिद्धी ग्रामविकास पॅनलचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले.

 

 

English summary :
A shocking incident took place on the eve of polling in Adarsh Gaon Ralegan Siddhi

Web Title: A shocking incident took place on the eve of polling in Adarsh Gaon Ralegan Siddhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.