नद्या फुल्लं, शेतं मात्र कोरडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 04:59 PM2018-08-23T16:59:01+5:302018-08-23T17:02:49+5:30

जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी, भीमा, प्रवरा, घोड या नद्या विविध धरणांतून सोडलेल्या अतिरिक्त पाण्यामुळे वाहत्या झाल्या आहेत. दिवसेंदिवस धरणांतून सोडण्यात येणा-या विसर्गात वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे, मात्र दुसरीकडे जिल्हा कोरडाच आहे.

Rivers flourish, the fields are dry only | नद्या फुल्लं, शेतं मात्र कोरडी

नद्या फुल्लं, शेतं मात्र कोरडी

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात विरोधाभासी चित्र : शेजारील जिल्ह्यांच्या पावसावर नद्या वाहत्यादक्षिणेतील धरणे रिकामीच, खरिपाचे उत्पादन घटणार

अहमदनगर : जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी, भीमा, प्रवरा, घोड या नद्या विविध धरणांतून सोडलेल्या अतिरिक्त पाण्यामुळे वाहत्या झाल्या आहेत. दिवसेंदिवस धरणांतून सोडण्यात येणा-या विसर्गात वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे, मात्र दुसरीकडे जिल्हा कोरडाच आहे. जिल्ह्यातील १४ पैकी ११ तालुक्यांत सरासरीच्या ६० टक्केही पाऊस झालेला नसल्याने शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान, एकीकडे जिल्ह्यातील नद्या भरलेल्या, मात्र शेतं कोरडीच असे विरोधाभासी चित्र दिसत आहे.
मागील वर्षी जिल्ह्यात सरासरी ५०० मिलीमीटर पाऊस झाला. त्यामुळे धरणे भरली, नद्या दुथडी भरून वाहिल्या, याशिवाय गावागावातील लहान मोठे पाझर तलाव, बंधारे, ओढे, नाले, नालाबंडिंग फुल्लं झाले. या पावसाने विहिरींच्या पाणीपातळीतही कमालीची वाढ झाली. त्यामुळे शेतकºयांनी खरिपासह रब्बीचीही भरघोस पिके काढली. शेतीउत्पन्नातही वाढ झाली. हे पाणी मे, जूनपर्यंत टिकले.
यंदा मात्र जूनच्या प्रारंभीच पावसाने ओढ दिली. त्यामुळे खरीप पिकांच्या पेरण्या लांबल्या. जूनअखेर झालेल्या तुरळक पावसावर काही भागात मूग, बाजरी, सोयाबीन, तूर, भूईमूग, कपाशीच्या पेरणी झाल्या. त्यानंतर मात्र पावसाने पुन्हा दडी मारली. पिकांना आवश्यक असणारा दुसरा पाऊस जुलैच्या मध्यावर हवा असताना पडला नाही. त्यामुळे खरिपाची सर्वच पिके सुकू लागली. आॅगस्ट उजाडला तरी पाऊस न पडल्याने पिकांची वाढ खुंटली. थेट १६ आॅगस्टला दोन दिवस झालेल्या भीज पावसावर या पिकांना काही अंशी जीवदान मिळाले. मात्र वाढ खुंटलेलीच राहिली. त्यामुळे या पावसाचा पाहिजे तितका फायदा पिकांना होणार नाही. दरम्यान, पावसाचे सुरूवातीचे अडिच महिने कोरडे गेल्याने विहिरींनी तळ गाठला आहे. गावोगावचे पाझर तलाव उपसले आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
दुसरीकडे पुणे, नाशिक या नगर जिल्ह्याच्या शेजारच्या जिल्ह्यांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे तेथील धरणे ओव्हफ्लो झाली. त्यामुळे या धरणांतील अतिरिक्त पाणी त्यांनी नदीपात्रात सोडले. या नद्या नगर जिल्ह्यातून वाहत असल्यामुळे केवळ नदीलाच पाणी दिसत आहे. कुकडी प्रकल्पातील डिंबे, वडज, येडगाव ही धरणे भरल्याने भीमा नदीपात्रात ६० हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. त्यामुळे भिमेला पूर आला. याशिवाय नाशिक जिल्ह्यातील धरणे भरल्याने नांदूर-मध्यमेश्वर बंधाºयातून २० हजार क्युसेक वेगाने पाणी सुरू असून, गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. बाहेरील जिल्ह्यांच्या पावसावर या नद्या वाहत्या झाल्या असल्या तरी नदीकाठची गावे सोडली तर इतर ठिकाणी पाणीपातळी खालावलेली आहे.

अकोल्यातील पावसाने ३२ टीएमसी नवे पाणी
जिल्ह्यातील चौदापैकी केवळ अकोले तालुक्यात आतापर्यंत दमदार (५०० मिमी) पाऊस झालेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मुळा धरणात १७ टीएमसी नवे पाणी आले. त्यातील ३ टीएमसी पाणी आवर्तनापोटी खर्च झाले असून सध्या धरणसाठा १९ टीएमसी (७२ टक्के) आहे. त्यानंतर अकोल्यातील भंडारदरा धरणात यंदा ८ टीएमसी नवीन पाणी येऊन हे धरण पंधरा दिवसांपूर्वीच ओव्हरफ्लो झाले. त्यातून निळवंडे धरणात आतापर्यंत ७ टीएमसी पाणी सोडले आहे. असे एकूण ३२ टीएमसी नवीन पाणी एकट्या अकोले तालुक्यातील पावसाने जिल्ह्याला मिळाले आहे.

इतर १३ तालुके पावसाच्या प्रतीक्षेत
अकोले वगळता एकाही तालुक्यातील पावसाने सरासरी ओलांडलेली नाही. संगमनेर (८७ टक्के) व श्रीरामपूर (८५) या तालुक्यांत समाधानकारक पाऊस असला, तरी कोपरगाव (६८), राहुरी (५५), नेवासा (४४), राहाता (६१), पाथर्डी (५१),शेवगाव (६९),जामखेड (५८) पारनेर (४८), श्रीगोंदा (४४), कर्जत (२७), नगर (४०) हे तालुके मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे दक्षिणेतील सीना, खैरी, मांडओहळ आदी प्रकल्पांत २५ टक्केही साठा नाही.
 

 

Web Title: Rivers flourish, the fields are dry only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.