Police chase and catch a sand damper | पोलिसांनी पाठलाग करून वाळूचा डंपर पकडला
पोलिसांनी पाठलाग करून वाळूचा डंपर पकडला

घारगाव : उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांच्या पथकाने संगमनेर तालुक्यातील नांदूर गावच्या शिवारात अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर पाठलाग करून पकडला. गुरुवारी रात्री साडेदहा वाजलेच्या सुमारास ही कारवाई केली. ४ ब्रास वाळूसह सुमारे ५ लाख १२ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी घारगाव पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत खैरदरा परिसरात मुळा नदीपात्रातून एका शेतात वाळूची अवैध चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस कॉन्स्टेबल बापूसाहेब हांडे, शांताराम मालुंजकर, शामराव हासे,आर.ए.लांघे, विशाल कर्पे यांंच्या पथकाने हा छापा टाकला. यात डंपर (क्रमांक एम.एच.-१७, बी.डी. ६८५५) हा वाळूची वाहतूक करून खैरदरा रस्त्याने जांबूतकडे जात असताना या पथकाने डंपरचा पाठलाग सुरू केला. चालकाच्या लक्षात येताच त्याने वाहनाची दिशा बदलवली. त्याने सुमारे चार ब्रास वाळू जांबूत-खैरदरा रस्त्यावर खाली करून पळ काढला. पथकाने नांदूर गावच्या शिवारात डंपरला पकडले. चौकशी दरम्यान वाळू वाहतुकीचा कोणताही शासकीय परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. सदर वाळू ही अजित मोरे (रा.खैरदरा जांबुत) यांच्या शेतातून आणल्याचे चालकाने पोलिसांना सांगितले. या कारवाईत चार ब्रास वाळूसह एकूण ५ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी चालक संकेत हरिभाऊ लामखडे (रा.केळेवाडी,बोटा,ता.संगमनेर) याच्यासह मालक संतोष तुळशीराम शेलार (रा.अकलापूर, ता.संगमनेर) यांच्याविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास पोलीस हेडकॉन्टेबल आर.ए.लांघे करीत आहेत.


Web Title: Police chase and catch a sand damper
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.