one died after bullet fired from gun while shooting tic toc video in shirdi two arrested | टिकटॉकचा व्हिडीओ बनवताना चुकून गोळी लागून 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू; दोघांना तुरुंगवास
टिकटॉकचा व्हिडीओ बनवताना चुकून गोळी लागून 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू; दोघांना तुरुंगवास

शिर्डी : टिकटॉकवर अपलोड करण्यासाठी एकमेकांचा व्हिडीओ काढत असताना गावठी कट्ट्यातून गोळी सुटून छातीत लागल्याने प्रतीक वाडेकर या युवकाचा मंगळवारी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी दोन आरोपींना जेरबंद करण्यात शिर्डी पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून गावठी कट्टादेखील ताब्यात घेण्यात आला आहे.

मंगळवारी सायंकाळी हॉटेल पवनधाम येथील रूम नंबर १०४ मध्ये काही मुले फ्रेश होण्यासाठी गेली होती. त्यावेळी गोळी लागून प्रतीक संतोष वाडेकर या युवकाचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या सोबत आलेल्या मुलांनी तिथून पळ काढला. गोळीच्या आवाजाने हॉटेलचे मालक गोविंद गरुड सावध झाले. त्यांनी हॉटेल बाहेर पळणाऱ्या एका मुलाला पकडलं. मात्र त्यांना धमकावून तोही पसार झाला. घटनेनंतर काही मिनिटांतच पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, पोलीस निरीक्षक अनिल कटके व सहकारी पोलीस उपनिरीक्षक पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. वाकचौरे यांनी घटनास्थळी प्राथमिक माहिती घेऊन तसंच सीसीटीव्ही फुटेज पाहून आरोपींच्या शोधासाठी तत्काळ तीन पथके रवाना केली.

आरोपींचा शोध सुरू असताना पोलीस निरीक्षक कटके यांना सदरचे आरोपी शहरातील रेल्वे स्टेशनलगत लपून बसले असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ तेथे जाऊन सनी पोपट पवार (वय २०, रा. धुळदेव, ता.फलटण, जि.सातारा) यास गावठी कट्टा व एका राऊंडसह ताब्यात घेतले. त्याचा सहकारी नितीन अशोक वाडेकर हा सुद्धा काही वेळातच पोलिसांना सापडला. विशेष म्हणजे मयत व आरोपी एकमेकांचे जवळचे नातलग आहेत.

सनी पवार याने टिकटॉक व्हिडीओ काढत असताना आपल्याकडून गोळी सुटून प्रतीकचा मृत्यू झाल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. घटनास्थळावरून उडालेल्या राऊंडची पुंगळीही जप्त करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक अनिल कटके पुढील तपास करत आहेत.
 


Web Title: one died after bullet fired from gun while shooting tic toc video in shirdi two arrested
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.